रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 07:55 PM2023-11-28T19:55:05+5:302023-11-28T19:55:41+5:30

धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.....

Five and a half TMC water from Khadakwasla canal for Rabi, no circulation for summer season | रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही

रब्बीसाठी खडकवासला कालव्यातून साडेपाच टीएमसी पाणी, उन्हाळी हंगामासाठी आवर्तन नाही

पुणे : रब्बी हंगामासाठी जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे साडेपाच टीएमसी पाणी यासाठी देण्यात येणार आहे. मात्र, धरणातील पाण्याची उपलब्धता बघता उन्हाळी हंगामासाठी आवर्तन देता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

रब्बी हंगामासाठी दौंड, इंदापूर, हवेली या भागातून पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे आली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आल्याचे खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून कालव्यातून सुमारे ७०० क्युसेकने पाणी ग्रामीण भागात दिले जाणार आहे. येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे साडेपाच टीएमसी पाणी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या खडकवासला प्रकल्पांमधील चारही धरणांत २५.६ टीएमसी अर्थात ८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून साडेपाच टीएमसी पाणी सोडल्यानंतर सुमारे २० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. ग्रामीण भागातही पुरेसा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. तसेच पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, हे पाणी सोडताना पुणे शहराच्या पिण्याच्या प्रश्न निर्माण होणार नाही, याकडेही महापालिकेने लक्ष वेधले होते. यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने ग्रामीण भागाला केवळ रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडावे, उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याची परिस्थिती नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

चारही धरणातील पाणी साठ्याचे व्यवस्थापन यंदा महत्त्वाचे ठरणार असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चारही धरणांमध्ये मिळून सध्या १.५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी याच वेळी चार धरणांमध्ये २७.२२ टीएमसी (९३ टक्के) जलसाठा होता. पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने यापूर्वीच दिला आहे. पिकांसाठी पाणी सोडल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळा येणार नाही, परंतु महापालिका प्रशासनाला पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पाणी व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.

टीएमसीमध्ये पाणीसाठा

टेमघर २.११ (५६ टक्के) वरसगाव ११.७ (९१ टक्के) पानशेत १०.२ (९५ टक्के) खडकवासला १.५ (७५ टक्के) भामा आसखेड ६.६७ (८७ टक्के) एकूण २५.६ टीएमसी (८७ टक्के) गेल्या वर्षीचा साठा २७.२ टीएमसी (९३ टक्के)

Web Title: Five and a half TMC water from Khadakwasla canal for Rabi, no circulation for summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.