दौंडमध्ये एकाचवेळी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडे; दरोडेखोरांच्या मारहाणीत पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 05:35 PM2021-10-16T17:35:00+5:302021-10-16T18:18:14+5:30
दरोडेखोर मराठी आणि हिंदीतून बोलत होते. दरोडेखोर जाताना घरातील लोकांना कोंढून गेले.
दौंड: शहरात आज मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा तर एका ठिकाणी घरफोडी केली आहे. यामध्ये सुमारे तीन लाखाचा ऐवज लंपास केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली. दरम्यान दरोडा सत्रात एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकून पोलिसाला शस्त्राने मारहाण केल्यामुळे या पोलीसाच्या ओठावर दहा टाके पडले आहे. तर अन्य एका ठिकाणी एका तरुणीने दरोडेखोरांबरोबर प्रतिकार करीत दरोडेखोरांना पिटाळून लावल्याने या तरुणीच्या धाडसाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
शहरातील विस्तारीत भागातील एकाच परिसरात हाकेच्या अंतरावर पाच ठिकाणी दरोडा टाकण्याचा दौंड शहरातील हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल. दरम्यान या दरोडा सत्रामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अण्णासाहेब देशमुख सरपंचवस्ती परिसरात राहतात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाचे कुलूप ऊचकाटून तोडून घरात घुसले. यावेळी एका चोरट्याने तीक्ष्ण हत्याराने अण्णासाहेब देशमुख यांच्या तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन चार दरोडेखोर त्यांच्या अंगावर बसले तर एका दरोडेखोराने त्यांच्या दोन लहान मुलांवर लोखंडी राॅड उगारला. यावेळी दरोडेखोरांनी रोख रक्कम सत्तर हजार आणि सोन्याचे दागीने घेऊन पोबारा केला.
दरोडेखोर मराठी आणि हिंदीतून बोलत होते. दरोडेखोर जाताना घरातील लोकांना कोंढून गेले. काही वेळातच आरडाओरडा झाल्यावर देशमुख यांच्या घराचा दरवाजा परिसरातील रहिवाशांनी उघडला. यावेळी नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला मात्र दरोडेखोर पळून गेले होते. दुसरा दरोडा येथील गजानन सोसायटीतील एका दुमजली घरावर टाकला. या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले यावेळी घरात फक्त दोन महिला होत्या. यावेळी दरोडेखोरांना पाहिल्यावर दोन्ही महिला भयभीत झाल्या. कमल तुपेकर ( वय ६० ) यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तसेच रोख सहा हजार रुपये घेतले.
गजानन सोसायटी पासून जवळच असलेल्या शिवराज नगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून दरोडेखोर घरात घुसले. घरातील सर्व मंडळी गावी गेली होती. यावेळी दरोडेखोरांनी घरातील एक घड्याळ आणि बावीस अमेरिकन डॉलरची चोरी केली. या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोज गायकवाड या सैनिकाच्या बंगल्याचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. या बंगल्यात कोणीही नव्हते दरोडेखोरांनी कपाटे उचकटून कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र या ठिकाणी दरोडेखोरांच्या हाती काही लागले नाही. सरपंच वस्तीच्या परिसरातच ढमे वस्ती येथे दरोडेखोरांनी रस्त्यालगत असलेल्या किशोर ढमे यांच्या घराजवळ आले.
या प्रसंगी दरोडेखोरांनी मागच्या दरवाज्याचे कटावणीने कुलूप तोडून घरात घुसले यावेळी घरातील सर्व झोपलेले होते. दरम्यान यावेळी साडेसहा हजार रोख आणि सोन्याचे दागीने दरोडेखोरांनी पळवले. मध्यरात्रीच्या सुमारास एकाच परिसरात पाच ठिकाणी दरोडे पडल्याने शहरात भीतीचे वातावरण होते पोलीसांना घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांच्यासह पोलीसांनी रात्रभर दरोडेखोरांचा शोध घेतला मात्र दरोडेखोर पोलीसांच्या हाती लागले नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पुणे येथून श्वानपथक बोलविण्यात आले होते परिसरात ज्या-ज्या ठिकाणी दरोडे पडले त्या त्या ठिकाणी श्वानपथक कळविण्यात आले आले होते.