चेक बाऊन्स झालेल्यांकडून वसूल केले पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:02+5:302021-04-16T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मिळकतकराची रक्कम चेकव्दारे (धनादेश) भरून, तो चेक बाऊन्स होणाऱ्या मिळकतकरधारकांना महापालिकेच्या विधी विभागाने चांगलाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मिळकतकराची रक्कम चेकव्दारे (धनादेश) भरून, तो चेक बाऊन्स होणाऱ्या मिळकतकरधारकांना महापालिकेच्या विधी विभागाने चांगलाच दणका दिला़ चेक बाऊन्स झाल्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, असा इशाराच विधी विभागाने नोटीसव्दारे संबंधितांना दिल्याने, महापालिकेच्या तिजोरीत बाउन्स चेकचे सुमारे पाच कोटी रूपये जमा झाले आहेत़
महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी अॅड. मंजूषा इधाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळकतकर विभागाकडे जुलै,२०१९ ते डिसेंबर,२०२० पर्यंत आलेल्या मिळकतकर रक्कमेच्या चेकपैकी ६०० चेक हे बाऊंस झाले होते़ या बाऊंस चेकची एकूण रक्कम ४ कोटी ८३ लाख ४६ हजार ३८ रूपये इतकी होती़ त्यामुळे विधी विभागाने बाऊंस चेक देणाऱ्यांकडून मिळकतकर वसुलीसाठी सामेश्वरवाले यांची नेमणूक केली व संबंधित मिळकतकरधारकांना लिगल डिमांड नोटीस पाठविण्यात आली़ मिळकतकराची रक्कम न भरल्यास संबंधित चेक बाऊन्सबाबतची कायदेशीर प्रकिया लागलीच सुरू करण्यात येईल असेही याव्दारे कळविण्यात आले़ परिणामी संबंधित ६०० मिळकतधारकांनी डिसेंबर,२०२० पर्यंत चेकव्दारे दिलेली रक्कम तातडीने जमा केली़ तर या काळात २३ मिळकतींवर फौजदारी केसेसही दाखल करण्यात आले़ यामुळे वसूल न झालेली ही जवळपास ५ कोटी रूपयांची सर्व रक्कम वसूल होण्यास मदत झाली आहे़
दरम्यान अभय योजनेव्दारे सवलतीचा लाभ घेऊन चेकव्दारे मिळकत भरणा करणाऱ्यांपैकी ११५ जणांचे चेक बाऊंस झाले असून, त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई विधी विभागाकडून करण्यात येणार असल्याचे अॅड. इधाटे यांनी सांगितले आहे़
-------------------------