सिंहगड विजयाचा त्रिशतकोत्तर रौप्यमहोत्सव उद्या
By admin | Published: June 30, 2017 03:53 AM2017-06-30T03:53:41+5:302017-06-30T03:53:41+5:30
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सिंहगडावर पुन्हा एकदा नरवीर तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच शौर्यपतका फडकावणाऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सिंहगडावर पुन्हा एकदा नरवीर तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच शौर्यपतका फडकावणाऱ्या नरवीर नावजी बलकवडे यांच्या सिंहगड विजयाचा त्रिशतकोत्तर रौप्यमहोत्सव १ व २ जुलै रोजी साजरा करण्यात येत आहे. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यांना यावेळी पुरस्कार देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांनी ही माहिती दिली. नरवीर नावजी बलकवडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात अनेक किल्ल्यांवर विजय पताका रोवली. त्याच मोहिमेत १ जुलै १६९३ रोजी पराक्रमाची शर्थ करून त्यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला. खुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीहून पत्र पाठवून त्यांचे यासाठी कौतुक केले. यावेळी ३२५ वर्षांनंतर या दिवसाची तारीख तिथी एकाच दिवशी आली आहे.
नावजी यांच्या स्मरणार्थ नरवीर नावजी बलकवडे स्मृती समिती स्थापन करण्यात आली असून समिती व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने १ जुलै रोजी (शनिवार) सकाळी ९ वाजता सिंहगड येथे पुणे दरवाजाजवळ विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. गडावरील सर्व देवतांचे तसेच राजाराम महाराज, तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. अजितराव आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. रविवारी (२ जुलै) सायंकाळी ६ वाजता वीर बाजी पासलकर स्मारक सिंहगड रस्ता येथे उमराणीकर यांना प्रसिद्ध व्यंगत्रिकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते नावजी बलकवडे शौर्य पुरस्कराचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक
डॉ. सदाशिवराव शिवदे असतील.