पाच दिवसांचा आठवडा, तरी कामे उरकेना; जिल्हा परिषदेत वारंवार हेलपाटे मारून नागरिक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:26 PM2022-01-12T13:26:35+5:302022-01-12T13:26:51+5:30
आपली कामे आज होईल, या आशेने ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र हेळसांड होत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत आहे
पुणे : प्रशासकीय कार्यालयतील कामे वेगवान व्हावी, या हेतूने पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला. या सोबतच कार्यालयीन कामांची वेळ वाढवण्यात आली. मात्र, असे असतानाही आपली कामे आज होईल, या आशेने ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र हेळसांड होत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत आहे. कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे येथे येणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत सोमवार आणि गुरुवार हा दिवस ग्रामीण भागातून येणारे नागरिक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवसांत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अनेक सर्वसामान्य नागरिक या दिवशी आपली कामे घेऊन मुख्यालयात येत असतात. आपली कामे आज तरी होतील या आशेने नागरिक असतात. मात्र, या नागरिकांची निराशा होत आहे. कागदपत्रांची अडचण किंवा कारकुनांच्या विविध कारणांमुळे कामे रखडत असल्याने नागरिक माघारी जात आहे.
जिल्हा परिषद, पुणे
वेळ सकाळी ९.३०
जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची वेळ ही ९.३० ते ६.३० आहे. ९.३० वाजता सर्व कर्मचारी कार्यालयात येणे अपेक्षित असताना १० ते १०. १५ पर्यंत कर्मचारी कार्यालयात येतात. सोमवारी सकाळी जवळपास ७५ टक्के कर्मचारी १० पर्यंत कामावर उपस्थित होते.
वेळ ६.१५ ची
६ वाजले की कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची चाहूल लागते. ६.१५ मिनिटाला प्रत्येक विभाग हा ओस पडायला सुरुवात होते. काही मोजकेच कर्मचारी या वेळेला उपस्थित राहतात. इतर कर्मचारी मात्र घरी जाण्यास निघाल्याचे चित्र होते.
दोन आठवड्यांपासून येतोय काम होईना
ग्रामपंचायतीत जागेच्या कामामुळे मी गेल्या दोन आठवड्यांपासून मुख्यालयात येत आहे. मात्र, अद्यापही माझ्या कामाचा निपटारा झालेला नाही. आज या.. उद्या या.. अशा प्रकारची उत्तरे मिळत आहे, असे एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. गावातील रस्त्यांच्या कामासंदर्भात आम्ही वारंवार मुख्यालयात येतो आहे. आमची तक्रार आम्ही सदस्यांकडे मांडली. या सोबतच कार्यालयाच्या चकराही मारत आहोत. मात्र, अद्यापही काहीही झाले नाही अशी खंत दौंड तालुक्यातून आलेल्या काहींनी व्यक्त केली.
''मुख्यालयात येणाऱ्यांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी १०० दिवस कार्यक्रमांतर्गत प्रलंबित कामे पूर्ण केली जात आहे. जवळपास सर्व विभागाची कामे पूर्ण होत आली आहे. शुक्रवार, शनिवारीही कामे केली जात आहे. काहींची कामे अपूर्ण राहण्याची काही प्रशासकीय अथवा इतर कारणे असू शकतात. त्या सोडवण्याचाही आमचा प्रयत्न असतो असे कमलाकर रणदिवे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन) यांनी सांगितले.''