रुळांवर पाणी साचल्यामुळे डेक्कन क्वीनला पाच तास उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:45+5:302021-07-17T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुरुवारी मध्यरात्री मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा चांगलीच प्रभावित झाली. पुणे-मुंबई डेक्कन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुरुवारी मध्यरात्री मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा चांगलीच प्रभावित झाली. पुणे-मुंबई डेक्कन क्वीनला मोठा फटका बसला. १० वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटी गाठणारी डेक्कन क्वीन शुक्रवारी अडीच वाजता दादर स्थानकावर होती. नंतर रेल्वे प्रशासनाने दादरच्या पुढे ही गाडी न सोडण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने सायन, कुर्ला, विद्याविहार आदी स्थानके ही पूर्णपणे पाण्याखाली गेली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक अचानक ठप्प झाली. पुण्याहून मुंबईकडे जाताना कर्जतपर्यंत रेल्वे सेवा सुरळीत सुरू होतं. कर्जतनंतर मात्र गाड्या थांबायला सुरुवात झाली. डेक्कन क्वीन दररोज सकाळी १० वाजता दादर स्थानकावर पोहोचते. शुक्रवारी मात्र १० वाजता ती भांडूप स्थानकावर होती. जवळपास तीन तास ही गाडी भांडुप स्थानकावर थांबून होती. दादरला दुपारी अडीचच्या सुमारास पोहचली. नंतर ही गाडी दादरहुन पुण्यासाठी मार्गस्थ झाली. पुण्याला रात्री ८ वाजून ३६ मिनिटांनी पोहोचली.
----------------------
गेल्या अनेक वर्षांपासून या गाडीने व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करीत आहे. गाडी सुपरफास्ट असल्याने प्रवास सहज व जलद होतो, परंतु आजच्या या प्रकरणाने खूप वेळ वाया गेला.
आशिष भालेराव, प्रवासी
----------------------
गेल्या १५ वर्षांपासून या गाडीने प्रवास करतोय. पावसाळ्यात अशा प्रकारचा अनुभव ही नित्याचीच बाब आहे. परंतु आजचा अनुभव वेगळाच होता.
साहिल कुल, प्रवासी