उजनी पाणलोट क्षेत्रात पाच तास वीजपुरवठा
By Admin | Published: April 13, 2016 03:25 AM2016-04-13T03:25:50+5:302016-04-13T03:25:50+5:30
उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपातीनंतर आक्रमक झालेल्या इंदापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी घेतलेल्या
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपातीनंतर आक्रमक झालेल्या इंदापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी घेतलेल्या बैैठकीत उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा पाच तास करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
वीजकपातीनंतर इंदापूरमध्ये संतप्त भावना व्यक्त होत होत्या. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वागाली शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्तारोको केल्यानंतर उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ माने आणि त्यांच्या समर्थकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. याबाबत सोमवारी (दि. ११) आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर सभापतींनी जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (दि. १२) उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजपुरवठा पाच तास करण्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण सोडले. (वार्ताहर)
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते आमदार अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, नारायण पाटील, आमदार बबनराव शिंदे व आमदार राहुल कुल यांची मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील इंदापूर,करमाळा, कर्जत, दौंड व माढा या पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यतील शेतीपंपाचा वीजपुरवठा दोन तासांवरून पाच तासांवर आणण्याचा निर्णय झाला, अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
वीजकपात शिथिल करण्याचा निर्णय झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी दशरथ माने व प्रदीप गारटकर यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना माने यांनी सांगितले, की जलसंपदा विभाग व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी, दिवाळीपर्यंत पाऊस पडला नाही, तर अवस्था बिकट होईल, अशा आशयाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रात वीजकपात करण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामी, पुढचे महाभारत घडले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.