दोन दिवसात पाच घरफोड्या

By admin | Published: May 3, 2017 02:11 AM2017-05-03T02:11:41+5:302017-05-03T02:11:41+5:30

शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे कोणी मूळ गावी, तर कोणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले आहेत. काही लग्न समारंभाच्या

Five house bursts in two days | दोन दिवसात पाच घरफोड्या

दोन दिवसात पाच घरफोड्या

Next

वाकड : शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे कोणी मूळ गावी, तर कोणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले आहेत. काही लग्न समारंभाच्या निमित्ताने गेले आहेत. या संधीचा फायदा उठविण्यासाठी चोरट्यांनी बंद सदनिका चोरीसाठी लक्ष्य केल्या. मंगळवारी भर दिवसा झालेल्या घरफोडीसह दोन दिवसांत तब्बल पाच घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
चोरट्यांनी ३१ एप्रिलच्या मध्यरात्री गणेशनगर, थेरगाव भागात दोन, वाकड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सद्गुरू कॉलनीत एक, ताथवडेत एक घरफोडी केली. याप्रकरणी लहू प्रभाकर कदम (वय ४५, रा. दुर्गा कॉलनी, गणेशनगर) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रहाटणीतील महात्मा फुले कॉलनीत भर दुपारी १२ ते ३च्या सुमारास घरातील लोक कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता सदनिकेचे कुलूप उचकटून साडेएकोणतीस तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी पळविले. याप्रकरणी योगेश धोंडिबा लांडगे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुर्गा कॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे तीन तोळे सोने व रोख सहा हजार रुपये चोरीला गेले. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे कपाट उचकटून दोन हजार रुपये पळविले. या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या इसमाने आरोपींना पाहिले असून चार इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. सद्गुरू कॉलनी, वाकड येथे राहुल अवचार यांच्या घरातून देवीचा चांदीचा मुकुट, एक तोळ्याचे सोन्याचे गंठण व अन्य दागिने असे दोन तोळे साने आणि ताथवडे येथे कपड्यांचे दुकान फोडून दोन लाखांच्या साड्या चोरट्यांनी पळविल्या आहेत.
सुटीच्या काळात नागरिक गावी जातात, हे लक्षात घेऊन वाकड पोलिसांनी वाकड हद्दीच्या प्रवेशमार्गावर तापकीर मळा चौक, रहाटणी रस्ता,गोडांबे चौक, बिर्ला हॉस्पिटल चौक या ठिकाणी चेक पॉइंट केले आहेत. मध्यरात्री एक ते पहाटे पाचपर्यंत येथून ये -जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची  आणि व्यक्तीची चौकशी करून  त्याची नोंद डायरीत केली  जाते. त्यामुळे चोरट्यांनी रावेत- पुनावळे येथील पुलाचा मार्ग वाकड हद्दीत प्रवेशासाठी अवलंबला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)

महिलेचे हात-पाय बांधून ऐवज लुटला

तळेगाव दाभाडे : घरात झोपलेल्या महिलेचे हातपाय बांधून चोरट्यांनी सव्वानऊ तोळे सोन्याचे दागिने व दोन मोबाइल संच घेऊन पोबारा केला. चोरीची ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील नालबंदगल्ली येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदुबाई सुलतानसिंह ठाकूर (वय ४९, रा. नालबंद गल्ली, तळेगाव दाभाडे) या घरात झोपल्या होत्या. त्याच वेळी चोरटे घरात शिरले. ठाकूर यांचे हात-पाय बांधून सव्वा नऊ तोळे सोन्याचे दागिने व दोन मोबाइल घेऊन चोरटे पसार झाले. ठाकूर यांची शेजारच्यांनी सुटका केली. नंतर मंगळवारी दुपारी ठाकूर यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तळेगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

Web Title: Five house bursts in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.