मेदनकरवाडीत खंडोबा देवाच्या दानपेटीत टाकल्या पाचशेच्या जुन्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 09:37 PM2018-02-12T21:37:30+5:302018-02-12T21:37:57+5:30
चाकण - मेदनकरवाडी (ता.खेड) येथील खंडोबा देवाच्या मंदीरातील दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा काही भाविकांनी टाकल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यात्रेनंतर दानपेटीतील देणगी मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या पाचशे रुपयांच्या एकूण अठरा नोटा म्हणजे नऊ हजार रुपये किंमतीच्या नोटा अज्ञात भाविकांकडून टाकण्यात आल्या असल्याची अशी माहीती खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास मेदनकर यांनी दिली.
मागील आठवड्यात माघ पौर्णिमेनिमित्त मेदनकरवाडी येथील खंडोबा देवाची यात्रा पार पडली. या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या कोणीतरी अज्ञात भाविकांनी या जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या असल्याची गावात चर्चा आहे. रामदास मेदनकर, अमित मेदनकर, सुभाष भुजबळ, नंदाराम भुजबळ आदी पदाधिकारी मंदिरात जमले असताना यात्रेत जमा झालेली देणगी मोजण्यासाठी दानपेटी उघडल्यानंतर भाविकांनी टाकलेली देणगीची रक्कम मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. आता या जुन्या नोटांचे काय करायचे? असा प्रश्न देवस्थान समोर उभा राहिला आहे. याबाबत धर्मदाय आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष मेदनकर यांनी सांगितले. भाविकांनी चलनातून बंद झालेल्या जुन्या नोटा दानपेटीत टाकू नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.