वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 10:40 PM2019-04-19T22:40:15+5:302019-04-19T22:40:39+5:30
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्या नजीक असलेल्या वरसोली टोल नाका येथे दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
लोणावळा - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्या नजीक असलेल्या वरसोली टोल नाका या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिरस्थावर तपासणी पथक यांच्याकडून सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख, पोलीस कर्मचारी विशाल जांभळे, संतोष शेळके, शरद जाधवर, काळे, योगेंद्र जगताप, अमित ठोसर, जाधव व चालक उर्किडे यांच्यासह स्थिरस्थावर तपासणी पथकाचे महेश जगताप व पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाकडून दुपारी 12:30 वाजता वाहन तपासणी सुरू असताना फॉर्च्युनर गाडी क्रमांक (MH 14 GK 9111) या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीन लाख रुपयांची रोकड मिळून आली. सदर रकमेबाबत वाहन चालकाकडे तपासणी केली असता त्याला कोणते समाधानकारक उत्तर देता आले नाही. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास देखील याच ठिकाणी वाहन तपासणी सुरू असताना इको फोर्ड कार क्रमांक (MH 04 B 6475) या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन लाख रुपयांची रोकड मिळून आली आहे. सदर रक्कमेबाबत चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर रक्कम पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात वरसोली टोल नाका परिसरात चार वाहनांमधून 11 लाख 80 हजार रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे.