दोघांकडून पकडले 5 लाख रुपयांचे वाघाचे कातडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 10:38 AM2019-09-29T10:38:59+5:302019-09-29T10:39:22+5:30
वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे हस्तगत केले आहे.
पुणे : वाघाचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पकडून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे वाघाचे कातडे हस्तगत केले आहे. रामेश्वर हरिश्चंद्र देशमुख (वय ३५) आणि विजय गणपत जगताप (वय ३८, रा. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना दोघे जण वाघाचे कातडे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे, लहू सातपुते व गुन्हे शाखेच्या युनिट १ चे कर्मचारी यांनी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांकडे एक मोठे गाठोडे होते. संशयावरून त्यांना पोलिसांनी अडविले. त्यांच्याकडच्या गाठोड्याची तपासणी केली तेव्हा त्यात वाघाचे कातडे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी वन विभागाच्या अधिका-यांना पाचारण केले. त्यांनी हे वाघाचे कातडे खरे असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर दोघांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या दोघांनी हे वाघाचे कातडे औरंगाबादहून आणल्याचे सांगत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर अधिक तपास करत आहेत.