पुणे विभागात तब्बल ५ लाख रेल्वे तिकिटे रद्द, ३८ कोटींचा रेल्वेने दिला परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:43+5:302021-05-06T14:35:28+5:30
पुणे स्थानकासह विभागातून सुटणाऱ्या गाड्यांच्या प्रवासासाठी जवळपास ५ लाख ९ हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलेले तिकीट रद्द केले.
प्रसाद कानडे-
पुणे : कोरोनाचावाढता प्रादुर्भाव व सार्वजनिक वाहतुकीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे लाखो प्रवाशांनी आपला नियोजित रेल्वे प्रवास रद्द केला. पुणे स्थानकासह विभागातून सुटणाऱ्या गाड्यांच्या प्रवासासाठी जवळपास ५ लाख ९ हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलेले तिकीट रद्द केले. त्याबदल्यात रेल्वेने ३८ कोटींचा परतावा प्रवाशांना दिला आहे. ही आकडेवारी मार्च व एप्रिल महिन्यातली असून एप्रिल महिन्यात ३ लाख ६ हजार प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केली आहे. हा आकडा केवळ पुणे विभागाचा आहे.
एप्रिल व मे महिना हा गर्दीचा हंगाम समजला जातो. त्यामुळे हजारो प्रवासी वेटिंग नको म्हणून आधीच आरक्षित तिकीट काढतात. मार्च महिन्याच्या मध्यापासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली. शेवटच्या आठवड्यात संख्येत लक्षणीय वाढ होत असताना काही राज्ये रेल्वे प्रवासाबाबत निर्बंध लावू लागले. त्यामुळे अनेक प्रवासी आपले तिकीट रद्द करण्यास सुरुवात केली. तर एप्रिल महिन्यात कोरोना टिपेला पोहोचला. या काळात देशातील बहुतांश राज्यात संचारबंदी, कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे लाखो प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यावर भर दिला.
........
प्रवासी नाहीत, रेल्वे रद्द
एप्रिल महिन्यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या पुणे-नागपूर, पुणे-अजनी, पुणे-नागपूर हमसफर एक्सप्रेस, पुणे-हबीबीगंज एसी एक्सप्रेस, पुणे-निझामुद्दीन दुरांतो आदी प्रमुख गाड्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. या गाड्यांमध्ये केवळ चार ते पाच टक्के प्रवासी होते. गाड्या तोट्यात धावू लागल्याने रेल्वे प्रशासनाने ह्या गाड्याही रद्द केल्या. त्या गाड्याचे ज्या प्रवाशांनी आरक्षित तिकीट काढले होते, त्यांनाही परतावा देण्यात आला. मात्र त्याचे प्रमाण कमी होते.
पुणे विभाग, प्रवासी संख्या, परतावा
मार्च २ लाख ३ हजार। १४ कोटी २२ लाख
एप्रिल ३ लाख ६ हजार २३ कोटी ७६ लाख