देशातील एक हजार खेळाडूंना दरवर्षी देणार पाच लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:24 AM2019-01-10T00:24:30+5:302019-01-10T00:25:11+5:30
केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड : ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’चे शानदार उद््घाटन
पुणे : देशातील खेळाडूंना तसेच क्रीडा सुविधांसाठी यापुढे भरभरून आथिक साह्य करणार असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोड तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खेलो इंडिया यूथ गेम्स २०१९’च्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी पुण्यात जाहीर केले. याअंतर्गत देशातील एक हजार खेळाडूंना प्रत्येकी ५ लाख रूपये पुढील ८ वर्षांसाठी देण्याची घोषणा क्रीडामंत्र्यांनी केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील राज्य शासनाच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन स्टेडियममध्ये या स्पर्धेचे उद्घाटन राजवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते थाटात झाले. या वेळी ते म्हणाले, ‘‘देशातील एक हजार प्रतिभावान खेळाडूंना भरभरून आर्थिक साह्य करण्यात येईल. या स्पर्धेत शानदार कामगिरी करणारे खेळाडू आगामी काळात आपली क्षमता उंचावून देशाला आॅलिम्पिक पदके जिंकून देतील, असा विश्वास मला आहे.’’ यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, चेअरमन राजेंद्र सिंग, नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर मुक्ता टिळक यांसह स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.
औरंगाबादमध्ये उभारणार राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ
राज्यात अनेक वर्षांपासून क्रीडा विद्यापीठाचे भिजत घोंगडे पडून आहे. खेलो इंडिया’चे दुसरे सत्र यंदात महाराष्ट्रात होत असल्याचे मुहुर्त साधून मुख्यमंत्रम्यांनी राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये उभारण्याची महत्वपूर्ण घोषणा उद्घाटनादरम्यान केली.
खेळांचे स्टेडियम उभारण्याकरीता यापूर्वी तालुकास्तरावर १ कोटी रुपये दिले जात होते, ते आता ५ कोटी रुपये देणार आहोत. जिल्हा स्तरावर ८ कोटी रुपये देत होतो, त्यात दुपटीने वाढ करून आता १६ कोटी रुपये देण्यात येतील. विभागस्तरावर स्टेडियम उभारण्यासाठी पूर्वी २४ कोटी रुपये देण्यात यायचे.ही रक्कम आता वाढवून ४५ कोटी रुपये इतकी देण्यात येणार आहे. खेळांची मैदाने तयार करुन महाराष्ट्र देखील देश आणि जगाला चांगले खेळाडू देऊ शकेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
उद््घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील परंपरिक लोककलांचे सादरीकरण झाले. या समारंभासाठी राज्यातील अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच ज्येष्ठ आॅलिंपिकपटूंना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील शिववंदना सादर करण्यात आली. याद्वारे शिवकालीन इतिहास उलगडून दाखविण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने स्टेडियम दुमदुमून गेले. खेळाडू, प्रशिक्षक व अन्य पदाधिकारी मिळून १० हजार लोकांचा सहभाग स्पर्धेमध्ये असणार आहे. महोत्सवासाठी विविध राज्यांच्या खेळाडूंचे आगमन झाल्यामुळे क्रीडानगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा महोत्सवात ३६ राज्यांतील ६ हजार खेळाडू, १ हजार ८०० तांत्रिक अधिकारी, १ हजारहून अधिक संघटक आणि ७५० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.