शिक्षकांकडून घेतले पाच लाख; महापालिकेत वर्ग करण्यासाठी गैैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 04:44 AM2018-04-08T04:44:15+5:302018-04-08T04:44:15+5:30
सोळा शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रती शिक्षक पाच लाख रुपये घेतले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
पिंपरी : सोळा शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रती शिक्षक पाच लाख रुपये घेतले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सीईटी’ परीक्षेत २०१० मध्ये पात्र ठरलेल्या प्राथमिक विभागातील १८ शिक्षकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश होता. त्यानुसार शिक्षण संचालकांच्या प्राथमिक विभागाने १८ शिक्षक महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग केले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांच्या नावे नोव्हेंबर २०१६ मध्ये पत्र आले होते. त्या वेळच्या शिक्षण मंडळाने या शिक्षकांना हजर करून घेण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता.
शिक्षकांचे ‘रोस्टर’ तपासले नाही असे कारण देत प्रशासनाने हे शिक्षक हजर करून घेण्यास दिरंगाई केली. परंतु, तत्कालीन पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ बोलणी फिस्कटल्याने त्या शिक्षकांना हजर करून घेण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे. दरम्यान, विलंब होत असल्याने हे शिक्षक पुन्हा न्यायालायात गेले. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर होत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली.
- महापालिकेत वर्ग करून घेण्यासाठी शिक्षकांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान राष्ट्रवादीची सत्ता जाऊन महापालिकेत भाजपाची सत्ता आली. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये १८ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांना हजर करून घेतले. यामध्ये प्रती शिक्षक ५ लाख रुपये घेत भाजपा पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाºयांनी आपले हात ओले करून घेतले असल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.