मुळशी तालुक्यामध्ये दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:20 PM2021-02-21T17:20:31+5:302021-02-21T17:21:08+5:30
मुळशी तालुक्यामधील कोळवन जवळ असलेल्या वाळेन गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये वळकी नदीच्या डोहामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिरंगुट : मुळशी तालुक्यामधील कोळवन जवळ असलेल्या वाळेन गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये वळकी नदीच्या डोहामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.वळकी नदीच्या डोहामध्ये धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या तीन मुली आणि तिच्या पतीसह अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळवण जवळील वाळेण गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये शंकर दशरथ लायागुडे (वय.३८ वर्ष),पौर्णिमा शंकर लायगुडे ( वय.३६ वर्ष),अर्पिता शंकर लायगुडे ( वय.२० वर्ष), अंकिता शंकर लायगुडे ( वय १३ वर्ष) आणि राजश्री शंकर लायगुडे ( वय.१२ वर्ष ) यांचा वळकी नदीतील डोहामध्ये असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर हे सर्वजण वाळेन ता,मुळशी जि.पुणे येथील रहिवासी आहेत
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाळेन गावातील वळकी नदीच्या डोहामध्ये कपडे धुण्यासाठी पौर्णिमा लायगुडे ह्या महिला गेल्या होत्या.तेव्हा कपडे धुवत असताना पौर्णिमा यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या.तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या जवळ असलेल्या तीन ही मुली पाण्यामध्ये गेल्या.पण या मध्ये कोनालाच पोहता येत नसल्याने हे सर्व जण पाण्यात बुडायला लागले होते.तेव्हा हा सर्व प्रकार पोर्णिमाचे पती व त्या मुलींचे वडील शंकर लायगुडे यांनी पहिला व या सर्वांना वाचविण्यासाठी त्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारली.परंतु दुर्दैवाने त्यांना सुध्दा पोहता येत नसल्याने एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी रित्या या पाच ही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
तर या घटनेची माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला कळताच हे पथक या ठिकाणी तात्काळ आले व त्यांनी येऊन पाण्यातील पाचही जणांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले असून पुढील तपासणीसाठी हे सर्व मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.तर या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वाळेण गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या घटनास्थळी पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे,पोलिस मृगदीप गायकवाड,पोलिस विजय कांबळे,आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे उपस्थित होते.