जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरणी पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:12 PM2018-06-04T16:12:12+5:302018-06-04T16:12:12+5:30
जितेंद्र जगताप यांना धमकावण्यासाठी गेलेल्या आरोपींसह त्यांनी फोटो काढला होता. दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि हे सर्व माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये पोलिसांना सापडला होता.
पुणे : जमिनीच्या वादातून जितेंद्र जगताप यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़. विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय२८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप (वय २८, रा़ घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़. समर्थ पोलीस ठाण्यासमोरील ४८१ रास्ता पेठे ही जमीन जगताप यांच्या ताब्यात असून ते त्याची देखभाल करत होते़. या जमिनीचा ताबा मानकर व कर्नाटकी यांच्याकडे सुद्धा आहे़. जगताप यांनी ही जागा ताब्यात द्यावी तसेच कोऱ्या कागदावर सही करावी, असा दबाव मानकर आणि कर्नाटकी यांच्याकडून आणला जात होता़. या जमिनीचा देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास कागदपत्रावर सही करु, असे जगताप यांनी त्यांना सांगितले होते़. त्यानंतर शनिवारी सकाळी विनोद भोळे व अन्य काही जण त्यांच्या रास्ता पेठेतील जागेवर गेले व त्यांना धमकावत जागेचा आजच्या आज ताबा देण्यास सांगितले़. त्यावेळी जगताप यांनी या सर्वांबरोबर फोटो काढला़. त्यानंतर घाबरलेले जगताप हे रिक्षातून घोरपडीला गेले़. त्यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली़. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्वजणांच्या त्रासाला कंटाळून करत आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते़.
पोलिसांनी ही चिठ्ठी व मोबाईलमधील फोटो जप्त केले असून त्यावरुन पाच जणांना अटक केली आहे़. समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत़.