व्हेल माशाच्या ‘अंबरग्रीस’च्या तस्करी प्रकरणी पाच जणांना रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:14 AM2021-08-29T04:14:49+5:302021-08-29T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस) तस्करी प्रकरणी पुणे वनविभागाने सहा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस) तस्करी प्रकरणी पुणे वनविभागाने सहा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे तीन किलोग्रॅमचा व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थासह चारचाकी जप्त करण्यात आली. पिंपरी चिंचवड येथील पूर्णानगर भागात ही कारवाई करण्यात आली.
मुहमदनईन मुटमतअली चौधरी (वय ५८), योगेश्वर सुधाकर साखरे (वय २५, रा. बालेवाडी), अनिल दिलीप कामठे (वय ४५, रा. फुरसुंगी), ज्योतिबा गोविंद जाधव (वय ३८), कृष्णात श्रीपती खोत (वय ५९) आणि एका ४४ वर्षीय महिलेला वनविभागाने पकडले. वनविभागाला व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थाची विक्री करण्यास काही अज्ञात व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक वनसंरक्षक पुणे विभाग, वनपरीक्षेत्र अधिकारी भांबुर्डा व वनकर्मचारी बनावट गि-हाईक बनून त्यांच्यासमोर गेले आणि सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कार्यवाही पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल महेश मेरगेवाड, विजय शिंदे, वनरक्षक सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, वनरक्षक महादेव चव्हाण आणि गणेश पाटील यांनी केली.
आपल्या परिसरात कोणत्याही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ देण्यात यावी. तसेच हॅलो फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.
----------------------------
अंबरग्रीस म्हणजे काय ?
व्हेल माशाच्या पोटातील अंबरग्रीस हा एक मेणयुक्त पदार्थ असून, तो व्हेलच्या आतड्यात तयार होतो. व्हेल जेव्हा समुद्रातील कठीण पदार्थांचे सेवन करतो. ते एकत्र येऊन त्यावर आतड्यांत प्रक्रिया होते आणि त्याचा मेणयुक्त पदार्थ तयार होतो. त्यालाच अंबरग्रीस म्हटले जाते. व्हेल मासा काही दिवसांनी तो पदार्थ शरीरातून बाहेर टाकतो.
जो अत्यंत दुर्मीळ आणि परफ्यूममध्ये वापरण्यात येतो. यामुळे सुगंध जास्त वेळ टिकून राहत असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मागणी असते. शुक्राणू व्हेल एक संरक्षित प्रजाती असल्याने, व्हेलची शिकार करण्यास परवानगी नाही.
अंबरग्रीस थोडासा मेणासारखा भासतो आणि अनेकदा आत दाणेदार दिसतो. अंबरग्रीस हे व्हेलपासून वेगळे केल्यानंतर त्याला विष्ठेसारखा वास येतो. पण ते सुकल्यानंतर मात्र सुगंधी आणि खूप छान वास येणारे होते. त्याला कस्तुरीसारखेही बोलले जाते.