वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग धरून पाच जणांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:33 AM2018-04-07T02:33:24+5:302018-04-07T02:33:24+5:30
वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग मनात धरून काटी (ता. इंदापूर) येथे पाच जणांना तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी बेदम मारल्याच्या आरोपावरून दहा जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
इंदापूर - वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग मनात धरून काटी (ता. इंदापूर) येथे पाच जणांना तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी बेदम मारल्याच्या आरोपावरून दहा जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हेमंत अशोक वाघमोडे, सचिन अशोक वाघमोडे, रवी दिलीप मासाळ, स्वप्निल सुनील मासाळ, सुनील चंद्रकांत सोलनकर, सूर्या सुनील मासाळ, गणेश बाळासाहेब सोलनकर (सर्व रा. काटी, ता. इंदापूर), समीर वाकसे (रा. खोरोची, ता. इंदापूर), किरण मारकड (रा. कौठळी, ता. इंदापूर), विकास देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. उमेश प्रदीप वाघमोडे (वय २४, रा. काटी, ता. इंदापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास काटी गावातील सतीश भोसले याच्या घरासमोर व गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर मारहाण झाली. फिर्यादी उमेश वाघमोडे, त्याचे चुलते नवनाथ विठोबा वाघमोडे, गिरीश दिनकर वाघमोडे, किसन दशरथ वाघमोडे, राजकुमार महादेव वाघमोडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी उमेश हा सतीश भोसले
याची दुचाकी देण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्या वेळी स्वीफ्ट
डिझायर गाडी (एमएच ४२/३०३३) व स्कार्पियो गाडी (एमएच ४२/ एएच १६१३)मधून आलेल्या आरोपींनी ‘विक्रम धनाजी बुट्टे यांच्या वाढदिवसाला का बोलावले नाहीस?’ अशी विचारणा करून ‘आत्ता तुम्हा एकेकाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देऊन तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी फिर्यादीवर हल्ला चढवला.
हा प्रकार पाहिल्यानंतर फिर्यादीचे चुलते नवनाथ विठोबा वाघमोडे, गिरीश दिनकर वाघमोडे त्याला सोडवण्यासाठी तेथे आले. त्यांनाही आरोपींनी मारहाण
केली. फिर्यादी घायाळ होऊन जमिनीवर पडल्यानंतर मरण
पावला, असे समजून आरोपी तेथून निघून गेले. गावातील डॉ. आंबेडकर कमानीजवळ आरोपींनी किसन दशरथ वाघमोडे, राजकुमार महादेव वाघमोडे यांनाही बेदम मारहाण
केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. फौजदार डी. एस. कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.