बाजरीच्या भाकरीमधून पाच जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:45 AM2018-10-21T01:45:30+5:302018-10-21T01:45:32+5:30
रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे.
परिंचे : येथे रोग पडलेल्या बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. रुग्णांवर सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून रोग पडलेल्या पिकांची बाजरी खाण्यासाठी न वापरण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नितानेकर यांनी केले आहे.
परिंचे, वीर परिसरातील बाजरीवर आर्किड नावाच्या बुरशीचा व आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. बाजरीची पिके जोमात येऊनही या रोगामुळे ९० टक्के पीक वाया गेले आहे. पुरंदर कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ तज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन बाजरीपिकाची पाहणी केली होती. पिकांवर पडलेल्या रोगाचे प्रमाण पाहता बाजरीचे धान्य अथवा जनावरांना चारा न घालण्याचे आव्हान कृषी अधिकाऱ्यांनी केले होते. पदरात पडलेले धान्य फेकून कसे द्यायचे व वर्षभर काय खायचे, या भावनेने शेतकºयांनी मात्र बाजरीचे धान्य खाण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या बाजरीच्या भाकरीमधून विषबाधा झाल्याची घटना परिंचेनजीक जोगमळा येथे घडली आहे.
नीलेश मारुती जाधव यांच्या घरी संध्याकाळच्या जेवण्यासाठी प्रादुर्भाव झालेल्या बाजरीची भाकरी करण्यात आली. घरातील सर्वांनी रात्री जेवण केले. मध्यरात्रीच्या वेळेस सर्वांना पोटदुखी, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे हा त्रास सुरू झाला. थोड्याच वेळात सर्वांना उलट्या चालू झाल्या.
सर्व रुग्णांना तातडीने परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार झाल्यावर सर्व रुग्णांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्ष्मी जाधव, संतोष जाधव, मंदा जाधव, गणेश चव्हाण, ओम जाधव यांना विषबाधा झाली.
सद्य:स्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिरसागर यांनी सांगितले. तसेच दूषित बाजरीचे धान्य न खाण्याचे आवाहन केले.