नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकासह पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:10 PM2018-07-20T12:10:44+5:302018-07-20T12:22:04+5:30
चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़.
पुणे : चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत़. त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे़.गजेंद्र बजाबा अभंग (वय ४७, रा़ संगमनेर, बी़ एड़ कॉलेज रोड, संगमनेर), विजय अभिमन्यू शिंदे (वय३८, रा़ वाकडेवाडी, संभाजीनगर, खडकी), अदित्य विश्वास चव्हाण (वय२५, रा़ भुगाव रोड, ता़ मुळशी), सुरेश पांडुरंग जगताप (वय ४०, रा़ खराडेवाडी, ता़ फलटण, जि़ सातारा) आणि नवनाथ काशिनाथ भंडागळे (वय २८, रा़ कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, वैभव पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी काही जण येणार आहे़ त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोहोमकर, माळी, बारवकर, केकाण, नदाफ, क्षीरसागर, माळवदकर यांनी रविवारी पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ सापळा रचला़ रात्री साडेअकराच्या सुमारास काही जण आले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातील दोघांकडील बॅगेत चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या १००ची १९ बंडले आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या १००ची १६० बंडले मिळून आली़ .
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या नोटा बदलून देण्यासाठी एक जण येणार होता़ त्यांची आम्ही वाट पहात होतो़ अशी माहिती मिळाली. खडक पोलिस अधिक तपास करीत आहेत़. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये या नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती़ त्या बदलून घेण्यासाठी डिसेंबरअखेर मुदत देण्यात आली होती़ या घटनेला आता काही महिन्यातच दोन वर्षे होतील, असे असताना लोकांनाकडे बाद झालेल्या इतक्या नोटा असल्याचे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत़.