पुण्यातील ब्राहमण महासंघाच्या अध्यक्षांसहीत पाच जणांवर गुन्हा दाखल; विनापरवानगी काढली बाजीराव पेशवेंची मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:23 PM2021-08-20T15:23:05+5:302021-08-20T15:25:50+5:30
लालमहाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान १८ ऑगस्टला सकाळी पावणे नऊ वाजता ही घटना घडली
पुणे : पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना देखील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी मिरवणूक काढल्याप्रकरणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह पाच जण आणि इतरांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दवे सह मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी आणि मदन सिन्नरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. लालमहाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान १८ ऑगस्टला सकाळी पावणे नऊ वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त दवे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यासाठी घोडा आणि वाजंत्री याचा वापर करून मिरवणूक काढण्यात आली. यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील कोणतीही खबरदारी न घेता लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सरडे पुढील तपास करीत आहेत.