सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह पाच जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 08:43 AM2019-07-07T08:43:44+5:302019-07-07T08:45:57+5:30
भोजनगृहात वारंवार आळ्या निघत असल्यामुळे विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात आले होते.
पुणे : भोजनगृहात वारंवार आळ्या निघत असल्यामुळे विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी पुणे न्यायालयात कुलगुरु नितीन करमळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कुलगुरू आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश चतु:श्रृगी पोलिसांना दिले होते. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कुलगुरु नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सिनेट सदस्य संजय चाकण, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत (सर्व रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी आकाश भीमराव भोसले (वय २५, रा. कार्टी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ एप्रिल २०१९ चे पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडला होता. याबाबतची माहिती अशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावर कारवाई करण्याऐवजी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडून चतु :श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांसह बारा विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांवर अन्यायकारकपणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून बोलले जात होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला विद्यार्थी आकाश भोसले आणि इतरांनी याविरोधात पुणे न्यायालयामध्ये धाव घेतली.
याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान या सर्वांवर अॅट्रॉसिटी कायदा व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री उशिरा कुलगुरुंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.