पुण्यात व्हेल माशाची ५ कोटींची उलटी विकण्यासाठी आलेल्या पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 08:34 PM2022-11-30T20:34:53+5:302022-11-30T20:35:22+5:30
जप्त करण्यात आलेल्या उलटीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ५ कोटी रुपये किंमत आहे...
पुणे : सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबर ग्रीस) विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांना डेक्कन पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या उलटीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ५ कोटी रुपये किंमत आहे.
राजेंद्र राकेश कोरडे (वय २८) नवाज अब्दुला कुरुपकर (वय२४), अजिम महमुद काजी (वय ५०, तिघे रा. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६ ), अक्षय विजय ठणगे (वय २६, दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांना मिळाली होती. सापळा लावून तिघांना पकडण्यात आले. त्यांच्या पिशवीतून व्हेल माशाच्या उलटीचे दोन तुकडे जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आल्याचे सांगून दोघे साथीदार रस्त्याच्या कडेला थांबल्याचे सांगितले. त्यानंतर अन्य दोघांना पकडण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कल्याणी पाडोळे, दत्ता शिंदे, महेंद्र बोरसे, स्मिता पवार, सचिन गायकवाड, विनय बडगे, स्वालेहा शेख, बाळासाहेब भांगले आदींनी ही कारवाई केली.
व्हेल माशाचा वावर खोल समुद्रात असतो. ब्ल्यू व्हेलला देव मासा म्हणून ओळखले जाते. या माशाच्या कोणत्याही अवयवाचा व्यापारी वापर गुन्हा आहे. हा मासा शारीरिक प्रक्रियेतून उलटी करतो. ती उलटी द्रव स्वरूपात असते. मात्र, उलटी पाण्यात विरघळणारी नसते. या उलटीला अंबर ग्रीस असे म्हटले जाते. त्याच्या न विरघळणाऱ्या द्रव स्वरूपामुळे या उलटीचा गठ्ठा तयार होतो. तो पाण्यावर तरंगू लागतो. हा गठ्ठा जाळ्यात अडकतो किंवा किनाऱ्यापर्यंत तरंगत येतो. अत्तर निर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जातो असे सांगितले जाते.