बारामतीत घरपट्टीमध्ये पाच टक्के सूट
By admin | Published: January 2, 2015 11:17 PM2015-01-02T23:17:15+5:302015-01-02T23:17:15+5:30
नगरपरिषदेच्या २०१४- १५ ते २०१७-१८ च्या चतुर्थ वार्षिक करआकारणीत बारामती नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ आणि ३ मध्ये ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे.
बारामती : नगरपरिषदेच्या २०१४- १५ ते २०१७-१८ च्या चतुर्थ वार्षिक करआकारणीत बारामती नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ आणि ३ मध्ये ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे.
सहायक नगररचनाकार सुनील मरळे यांनी करआकारणीत सर्व हरकतींवर सुनावणी घेतली. त्यानंतर झोन क्रमांक १ मधील सिद्धेश्वर गल्ली, श्रीराम गल्ली, ढोर गल्ली, भोई गल्ली, खाटीक गल्ली, कसाब गल्ली, मुजावर वाडा, गोकुळवाडी, श्रावण गल्ली, बुरूडगल्ली, बाबर बोळ, तालीम गल्ली, पंचशीलनगर, साठेनगर, कसबा आदी भागात नगरसेवक सुनील सस्ते यांच्या विनंतीवरून समक्ष पाहणी केली. झोन क्रमांक १ मध्ये परिसर येत असताना यातील मुख्य रस्ता वगळता अंतर्गत रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही. या भागात गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचा समावेश आहे. तरीदेखील सर्वाधिक घरपट्टीचा दर या नागरिकांना द्यावा लागतो. २० वर्ष हे नागरिक वाढीव दराने घरपट्टी भरत आहेत. या नागरिकांना सूट मिळावी, अशी मागणी नगरसेवक सस्ते यांनी केली होती. दरम्यान, झोनमधील मुख्य रस्ते वगळता सर्व बिगर व्यावसायिक मिळकतधारकांना ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे.
हरकतदारांनी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांनी नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ व ३ मधील मुख्य रस्ते वगळता बिगर व्यावसायिक मिळकतधारकांना ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
सूट समाधानकारक नाही
वास्तविक पाहता चतुर्थ करआकारणीत सरसकट २० टक्के केलेली दरवाढ अन्यायकारक आहे, असे असताना १० हजारांहून अनेक नागरिकांनी हरकती घेतल्या. मात्र, दिलेली सूट समाधानकारक नाही. सर्वांनी या प्रकरणी लक्ष दिले असते तर शहराला घरपट्टीमध्ये समाधानकारक सूट मिळाली असती, असे नगरसेवक सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.