इराणी चोराकडून एका तासात पाच सोनसाखळ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:35 AM2019-02-24T00:35:49+5:302019-02-24T00:35:58+5:30
आरोपीसंदर्भात माहिती मिळाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याच्या नातेवाइकांनी हल्ला देखील केला होता.
पुणे : सिंहगड, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तासाच पाच सोनसाखळ्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन) मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या सराइतावर विविध जिल्ह्यांत सोनसाखळी चोरीचे २१ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ५ लाख २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुलाम अली सरताज अली जाफरी (३0, रा. आंबिवली, जि.ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात परिमंडळ तीनच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळ्या चोरीची कबुली आरोपीने दिली आहे. त्याने एका तासात सिंहगड, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच सोनसाखळ्यांची चोरी केली होती.
आरोपीसंदर्भात माहिती मिळाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याच्या नातेवाइकांनी हल्ला देखील केला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषणही करण्यात आले होते. त्यामध्ये तो ठाण्यातील आंबिवली येथील असल्याचे उघड झाले होते. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने सिंहगड रस्ता ३, वारजे १, कोथरुड २, अलंकार १ अशा एकूण सात सोनसाखळी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा ५ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याचा साथीदार आणि एक नातेवाईक देखील निष्पन्न झाला आहे. त्यांचा पोलीस पथके शोध घेत आहेत. संबंधित आरोपी हे इराणी असून त्यांच्यावर यापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
४ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, जीवन मोहिते, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, सचिन माळवे, नीलेश जमदाडे, बाबुलाल तांदळे, दयानंद तेलंगे पाटील, अविनाश कोंडे, किशोर शिंदे, मयूर शिंदे, योगेश झेंडे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रफिक नदाफ, हरीश गायकवाड, श्रीकांत दगडे, योगेश बडगे, किरण राऊत, संदीप धनवटे, वामन जाधव, मोहन भुरुक, राजेश सुर्वे, नीलेश कुलथे, पुरुषोत्तम गुन्ला, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.