हॉटेल-रुग्णालयांसाठी ‘फाइव्ह स्टार’ सवलती
By admin | Published: November 20, 2014 04:25 AM2014-11-20T04:25:13+5:302014-11-20T04:25:13+5:30
महापालिकेने अगोदरच शहरातील काही प्रथितयश ‘फाइव्ह स्टार’ हॉस्पिटलवर वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) खैरात केली आहे
हणमंत पाटील, पुणे
महापालिकेने अगोदरच शहरातील काही प्रथितयश ‘फाइव्ह स्टार’ हॉस्पिटलवर वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) खैरात केली आहे. मात्र, या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तरीही शहरातील नव्याने प्रस्तावित आणखी काही ‘फाइव्ह स्टार’ हॉस्पिटल व हॉटेलच्या उभारणीसाठी प्रिमीयममध्ये सवलती देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ऐनवेळी दाखल झाला आहे.
सध्या पालिकेने शहरात रुबी, सह्याद्री, औंध व इनलॅक्स हॉस्पिटलला वाढीव ‘एफएसआय’ची सवलत दिली आहे. धर्मादाय आयुक्तांकडूनही सर्व हॉस्पिटलला सवलत दिली जाते. त्या बदल्यात संबंधित हॉस्पिटलमध्ये शहरातील गरीब रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमध्ये गेल्या तीन वर्षांत महापालिकेने दिलेल्या वाढीव ‘एफएसआय’नुसार १० टक्केप्रमाणे ३० हजार गरीब रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १५० रुग्णांवर उपचार झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून फाइव्ह स्टार हॉस्पिटलला दिल्या जाणाऱ्या सवलतींचा फायदा गरीब रुग्णांऐवजी संचालकांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तरीही शहरातील काही नव्याने प्रस्तावित फाइव्ह स्टार हॉस्पिटल व हॉटेल डोळ्यांपुढे ठेवून काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी त्यांना सवलतीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ११ नोव्हेंबरला ऐनवेळी दाखल केला. सद्य:स्थितीत महापालिकेच्या नियमानुसार फाइव्ह स्टार हॉटेल व हॉस्पिटलचे जिने, लिफ्ट व लॉबिजला रेडीरेकनरनुसार प्रिमीयम आकारला जातो. त्यामुळे नवीन रुग्णालये व हॉटेल वाढण्यास मर्यादा येत आहेत. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णालयातील खाटांची संख्या ५००० इतकी कमी आहे. तसेच, नव्याने रुग्णालय उभारणे आणि चालविणे खर्चिक होत असून, तोटा वाढत चालला आहे, अशी बाजू प्रस्तावात संबंधित सदस्यांनी मांडली आहे.