जिल्हा न्यायालयात उभारणार पाच मजली इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:47+5:302021-05-21T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारातील चार नंबरचे प्रवेशद्वार ते लॉयर्स चेंबर बिल्डिंग ए पर्यंतचे सर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारातील चार नंबरचे प्रवेशद्वार ते लॉयर्स चेंबर बिल्डिंग ए पर्यंतचे सर्व जुने बांधकाम पाडून त्या जागी पाच मजली भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे करणार असल्याचे पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नवीन इमारतीचे डिझाईन तयार करण्यात येत आहे.
गेटनंबर चार, बराक कोर्ट, बार असोसिएशनचे कार्यालय आणि लॉयर्स चेंबर बिल्डिंग ए पर्यंत असलेले जुने बांधकाम पाडण्यास जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी सांगितले. त्यामुळे बार असोसिएशन व लॉयर्स चेंबर बिल्डिंग ए मधील ११ चेंबरचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे अॅड. मुळीक यांनी सांगितले.
............
दीड हजार दुचाकी व ६०० कारच्या पार्किंगची व्यवस्था
नव्या इमारतीमध्ये २ मजले हे पार्किंगसाठी ठेवण्यात येणार असून त्यात सुमारे दीड हजार दुचाकी व ५०० ते ६०० कार पार्किंगची व्यवस्था असणार आहे. तसेच ५०० ते ६०० आसन व्यवस्था असलेला हॉलही उभारण्याचा प्रयत्न असणार आहे, असे अॅड. मुळीक यांनी सांगितले़