भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास; चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 01:19 PM2022-04-20T13:19:06+5:302022-04-20T13:19:13+5:30
भाजपा : काल आज आणि उद्या पुस्तक प्रकाशनात पाटील बोलत होते
पुणे : पुण्यात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा : काल आज आणि उद्या’ या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत अन्य नेतेही उपस्थित होते. कार्यक्रमात भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पाटील म्हणाले, भाजप १९८० साली स्थापन झाला आहे. असे समजणारे खूप महान आहेत. हा खरतर त्यांच्या अज्ञानाचा भाग असू शकतो. ज्यांना प्रसिद्धीसाठी रोज काहीतरी बोलण्याची इच्छा होते. अशी लोक भाजप ८० साली स्थापन झाला. आणि त्यानंतर आम्ही गावोगावी नेलं असं त्यांना वाटते. परंतु भाजपलाही पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला. आता राज्यात नवी इकोसिस्टीम तयार झाली आहे. त्यामध्ये एकदा खोटं बोललं कि तेच सातत्याने बोलत राहायचं. मग लोकांनाही ते खरे वाटू लागते. ज्यांना आम्ही पार्टी मोठी केली, गावोगावी नेली, आमच्यामुळे पार्टी मोठी झाली असं वाटण्याच्या स्थितीत हे पुस्तक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मॅक्समूलरने खोटा इतिहास रुजवला; आर्य मूळचे भारतीयच
मॅक्समूलरने पद्धतशीरपणे ‘आर्य’ हे मध्य युरोपातून आल्याचा खोटा इतिहास रुजवला. तोच इतिहास आपल्याला हजारो, शेकडो वर्षे शिकविला गेला. मात्र, अनेक इतिहासकारांनी संशोधनातून ‘आर्य’ हे मूळचे येथील असल्याचे सिद्ध केले आहे. जगात सर्वात जुनी भारतीय संस्कृती आहे. राम मंदिर, कृष्ण मंदिर अथवा काशी विश्वेश्वर, सोमनाथाच्या मंदिराची केवळ तोडफोड नाही तर भारतीयांचा विचार, संस्कृती संपवणे हाच मोगलांचा डाव होता. तोच कित्ता पुढे इंग्रजांनी सुरू ठेवला. मशीद बांधणे हा उद्देश नव्हता तर भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिर, कृष्णाची मंदिरे, भारतीयांची संस्कृती नष्ट करण्याचा डाव होता, असा आरोप यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.