पाच टन कांदा फेकला उकिरड्यावर, उत्पादनाच्या खर्चाइतकाही दर नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:22 AM2019-02-08T00:22:28+5:302019-02-08T00:28:10+5:30
कांद्याचे दर कोसळल्याने कळंब येथील शेतकऱ्याने ५ टन कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. कांद्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई होईल, अशी स्वप्ने ज्या डोळ्यांनी पाहिली त्याच डोळ्यांत कांद्याने आज अक्षरश: पाणी आणले आहे.
कळंब - कांद्याचे दर कोसळल्याने कळंब येथील शेतकऱ्याने ५ टन कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. कांद्याच्या उत्पादनातून लाखो रुपयांची कमाई होईल, अशी स्वप्ने ज्या डोळ्यांनी पाहिली त्याच डोळ्यांत कांद्याने आज अक्षरश: पाणी आणले आहे.
कळंब येथील शेतकरी नामदेव शंकर गायकवाड यांनी त्यांच्या शेतामध्ये गट नंबर ३६१ व ३६२ मध्ये उसनवारी करून ५ एकर कांदापीक घेतले. जवळपास ७०० गोण्या कांदा भरून बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर २ रुपये किलोने भाव मिळाला. हताश झालेल्या नामदेव गायकवाड या शेतकºयाने उकिरड्यावर कांदा फेकून दिला.
किमान कांद्याचे खत तयार होऊन शेतीला उपयोगी पडेल अशी अपेक्षा गायकवाड कुटुंबीयांना आहे. ५ एकर कांद्याचे पीक हातात घेण्यासाठी जवळपास १ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला.
ठोक भावाने आत्तापर्यंत विक्री करूनही हातात फक्त ६० हजार रुपये आले आहेत. उर्वरित कांदा सडून जाण्याच्या काळजीने नामदेव गायकवाड यांनी काळजावर दगड ठेवून तोटा सहन करून कांदा अक्षरश: उकिरड्यावर फेकून दिला. शासनाने कांद्यावर निर्यातीला घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी गायकवाड कुटुंबीयांची आहे.