जुन्नर तालुक्यातील टोमॅटोवर पाच प्रकारचे विषाणू, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:53+5:302021-06-03T04:08:53+5:30

खोडद : जुन्नर तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत १२ विषाणूंची तपासणी ...

Five types of virus on tomatoes in Junnar taluka, loss of millions of rupees to farmers | जुन्नर तालुक्यातील टोमॅटोवर पाच प्रकारचे विषाणू, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

जुन्नर तालुक्यातील टोमॅटोवर पाच प्रकारचे विषाणू, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Next

खोडद : जुन्नर तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी याबाबत १२ विषाणूंची तपासणी केल्यानंतर जुन्नर तालुक्यातील टोमॅटोवर ५ ते ६ विषाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिली.

टोमॅटोच्या लवकर पिकण्याकरिता महाराष्ट्रात विविध प्रकारचे व्हायरस जबाबदार आहेत, असे भारतीय बागायती संशोधन संस्था (आयआयएचआर) बेंगळुरू यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. टोमॅटो पिकविणाऱ्यांपैकी सातारा, अहमदनगर आणि पुणे या भागात प्रथमच हा रोग आढळून आला होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना गावडे म्हणाले की, डॉ. कृषी विभागाने बाधित पिकांचे नमुने आयआयएचआरकडे चाचणीसाठी पाठविले होते. या अहवालात व्हायरल हल्ल्याच्या प्राथमिक रोगाचे निदान झाले आहे. आयआयएचआरने काकडी मोझॅक व्हायरस (सीएमव्ही), मिरची व्हेनल मोटल व्हायरस (चिविमव्ही), शेंगदाणा कळी नेक्रोसिस व्हायरस (जीबीएनव्ही), बटाटा स्पिंडल कंद व्हायरॉईड (पीएसटीव्हीडी), टोमॅटो लीफ कर्ल बंगळुरू व्हायरस (१२) विषाणूंच्या नमुन्यांची चाचणी केली. टोएलसीबीव्ही, टोमॅटो लीड कर्ल नवी दिल्ली व्हायरस (टॉएलसीएनडीव्ही), तंबाखूची नस विकृत व्हायरस (टीव्हीडीव्ही), टोमॅटो क्लोरोसिस विषाणू (टीसीव्ही), टोमॅटो मोझॅक व्हायरस (टोमव्ही), टोमॅटो क्लोरोसिस विषाणू (टीसीव्ही), टोमॅटो मोज़ेक विषाणू (टोमव्ही), टोमॅटो ब्राऊन रगोज फळ विषाणू (तोब्राफव्ही), टोमॅटो रिंग स्पॉट व्हायरस (टीआरएसव्ही) आणि टोमॅटो स्पॉट विल्ट व्हायरस (टीएसडब्ल्यू) हे १२ विषाणू तपासले असून यांपैकी काकडी मोझॅक व्हायरस (सीएमव्ही),तंबाखूची नस विकृत व्हायरस (टीव्हीडीव्ही), टोमॅटो मोज़ेक विषाणू (टी एममव्ही), टोमॅटो क्लोरोसिस विषाणू (टीसीव्ही), शेंगदाणा कळी नेक्रोसिस व्हायरस (जीबीएनव्ही) या विषाणूंचा प्रादुर्भाव टोमॅटोवर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या विषाणूबाधित टोमॅटो बाबतीत अनेक तक्रारी वाढल्या आहेत. टोमॅटो लवकर पिकणे, पिवळ्या रंगाचे आणि फळांमध्ये विकृती आढळून येत असून, शेवटी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्राथमिक तपासणीत कुठल्याही किडींनी प्रादुर्भाव झालेला आढळून आला नाही, तरीदेखील टोमॅटो बागा या विषाणूंमुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

नामांकित स्त्रोतांकडून दर्जेदार बियाणे उपलब्ध असल्यास रोगास प्रतिरोधक, सहनशील वाणांचा वापर करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी परवानाधारक रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. अशा रोपवाटिकेमध्ये इन्सेक्ट नेट-हाऊस, पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस अशा सुविधा असाव्यात.

-डॉ. दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, ता. जुन्नर

जुन्नर तालुक्यात सुमारे ४०० शेतकऱ्यांनी ३ हजार हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली असून, १३० ते १५० हेक्टर क्षेत्रांतील टोमॅटोला या विषाणूंची बाधा झाली आहे. एकूण क्षेत्राच्या २५ ते ३० टक्के फळधारणा चालू आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकरी कांदा व टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.

- सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर

येडगाव येथे विषाणूबाधित टोमॅटोची पाहणी करताना जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विकास अधिकारी संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, पंचायत समिती कृषी अधिकारी खेडकर व इतर कृषी विभागाचे अधिकारी.

Web Title: Five types of virus on tomatoes in Junnar taluka, loss of millions of rupees to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.