पाच आठवड्यांत पॉझिटिव्हिटी रेट आला ६ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:03+5:302021-06-06T04:08:03+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या ५० हजारांवर गेली होती. या काळात पॉझिटिव्हिटी रेटही मोठ्या प्रमाणावर वाढला होता. ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या ५० हजारांवर गेली होती. या काळात पॉझिटिव्हिटी रेटही मोठ्या प्रमाणावर वाढला होता. परंतु, मागील पाच आठवड्यात हा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली. त्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेली. मार्च-एप्रिल आणि मे महिन्यात शहरात कोरोनाने थैमान घातले होते. चाचण्यांच्या संख्येच्या तुलनेत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या वाढत होती. प्रशासनाने या काळात बेड वाढविण्यासाठी प्रयत्न केले. जम्बो कोविड सेंटरसह पालिकेची सर्व कोविड रुग्णालये आणि खासगी रुग्णालयात कोविड उपचारांवर भर देण्यात आला होता.
मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून रुग्ण घटण्यास सुरुवात झाली. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या घटत गेल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मोठा दिलासा मिळाला. मागील तीन महिन्यांत पहिल्यांदाच रुग्णसंख्या ५ हजारांच्या खाली गेली होती. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने प्रशासनानेही सुस्कारा सोडला असून लाट ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
----
आठवडा। चाचण्या। पॉझिटिव्ह रुग्ण। पॉझिटिव्हिटी रेट
३० एप्रिल-०६ मे। १,२१,५०९। २३,८५२। १९.७७%
०७ मे - १३ मे। ९७,२०२। १५,२०६। १५.६३%
१४ मे - २० मे। ७८,०२२। ८,६४६। १०.९१%
२१ मे - २७ मे। ६४,३८५। ५,०२६। ७.८०%
२८ मे - ०३ जून। ४९,६४१। ३,०९९। ६.११%