पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ठिकाणी सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या कारवाईत 5 महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:22 PM2022-02-18T15:22:20+5:302022-02-18T15:33:36+5:30
पोलिसांच्या या कारवाईत पाच महिलांना ताब्यात घेतले आहे...
पिंपरी : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही कारवाईत पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (दि. १७) या दोन्ही कारवाया करण्यात आल्या आहेत.
पहिल्या कारवाईमध्ये संजय राजेंद्र एडके (वय ३६, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सुरज परखंदे (वय ३६, रा. साडेसतरानळी हडपसर), सारिका रामेश्वर भोसले (वय २३, रा. अक्षयनगर भोसरी), मनीषा संतोष चौधरी (वय ३२ रा. चिखली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपी महिला आळंदी रोडवर मॅक्झिन चौक येथे फिर्यादी आणि इतरांना अश्लील हावभाव करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल, त्रास होईल असे वर्तन करत होत्या. तसेच त्यांनी सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये संतोष प्रल्हाद मुसळे (वय २२, रा. इंद्रायणीनगर, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंजू अकबर मोडल (वय ३२, रा. बुधवार पेठ, पुणे), लाजो अबुल कासिम मिर शेख (वय ३१, रा. बुधवार पेठ, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी देहूफाटा आळंदी येथे दुचाकीवरून जात होते. आळंदी चाकण रस्त्यावरती वाय जंक्शनच्या पुढे आरोपी महिलांनी फिर्यादी आणि इतरांना लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल व त्रास होईल असे वर्तन केले. तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी कृती केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.