पुणे : पाच वर्षे सत्ता, मात्र भाजपच रस्ते दुरुस्तीसाठी करतेय आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:20 PM2022-06-10T13:20:52+5:302022-06-10T13:25:01+5:30
रस्त्यावरील खड्डे, पावसाळी गटारे आदी कामे न झाल्याने आंदोलन...
पुणे : महापालिकेच्या सर्व विभागांचा समन्वय साधून शहरातील रस्त्यांवरील खोदाईची कामे पूर्ण करून रस्तेदुरुस्ती पावसाळ्यापूर्वी केली जाणार, असा दावा करणाऱ्या मावळत्या सत्ताधारी भाजपनेच आज रस्त्यावरील खड्डे, पावसाळी गटारे आदी कामे न झाल्याने आंदोलन केले. पाच वर्षे सत्तेत असताना एक चकार न काढणाऱ्या भाजपने आज नादुरुस्त रस्त्यांचे खापर प्रशासनावर फोडले आहे.
खासदार गिरीश बापट व आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यलय व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय येथे प्रशासनाविरोधात जन आंदोलन करण्यात आले.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक पदाधिकारी असताना या मतदारसंघात विकासकामे होत नसल्याचे सांगून, आजच्या आंदोलनात प्रशासनाविरोधात निर्दशने करण्यात आली. विशेष म्हणजे, या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत सर्वधित सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाईन बदलणे, पथदिवे, तसेच पदपथ करण्यासाठी कोट्यवधीची कामे झाली आहेत. या कामासाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, ते प्रशासनाकडून दुरुस्त करण्यात येत नसल्याचा ठपका भाजपने ठेवला आहे.
पुणे महापालिकेवर प्रशासन नेमण्यात आल्यानंतर आयुक्तांपासून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विकासकामे पूर्ण करावीत यासाठी निवेदने देण्यात आली. तरीही प्रशासनाने या कामात कोणतही ठोस नियोजन करून कामे पूर्ण केली नाहीत म्हणून आज धरणे आंदोलन शांततेत करण्यात आले आहे. येत्या सात दिवसांत प्रशासनानेही ही सर्व काम पूर्ण नाही केली, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी प्रशासनाला दिला आहे.