क्रेडाईच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:26+5:302021-03-31T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोलकात्याच्या हर्षवर्धन पटोडिया यांची २०२१-२३ या कालावधीसाठी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोलकात्याच्या हर्षवर्धन पटोडिया यांची २०२१-२३ या कालावधीसाठी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही खासगी बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असून, देशातील २१ राज्यांमधल्या २१७ शहरांमध्ये संस्थेच्या शाखा आहेत.
मावळते अध्यक्ष पुण्याचे सतीश मगर यांचा कालावधी ३१ मार्चला संपला. मगर हे आता क्रेडाई राष्ट्रीयचे चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. मंगळवारी (दि. ३०) ऑनलाईन सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
पुण्यातील शांतिलाल कटारिया यांची क्रेडाई राष्ट्रीयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. क्रेडाई पुणे मेट्रोचे अन्य काही सदस्य आणि पदाधिकारी आता राष्ट्रीय स्तरावरील काही समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये सुहास मर्चंट (आकडेवारी आणि मानके), जे. पी. श्रॉफ (कौशल्य विकास), मनीष कनेरिया (पर्यावरण), आय. पी. इनामदार (कायदेशीर बाबी) हे संबंधित समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. कपिल गांधी (जनसंपर्क आणि प्रसिद्धी) समितीचे सह-अध्यक्ष असतील. या संदर्भात शांतिलाल कटारिया म्हणले, “क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात यापुढे क्रेडाई राष्ट्रीयसाठी काम करणार आहेत ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.”
चौकट
अडीच कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी
देशातल्या क्रेडाई सदस्यांच्या साईटवरील अडीच कोटी बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य कोविड-१९ लसीकरण मोहीम राबवणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पटोडिया यांनी केली. “संपूर्ण क्रेडाई कुटुंबाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने आणि मगर यांच्या नेतृत्वात पुढे उत्तम कार्य करण्यासाठी मी सज्ज आहे. सध्या हे क्षेत्र तोंड देत असलेल्या सध्याच्या आव्हानासह रियल इस्टेट क्षेत्राला पुनरुज्जीवन देण्यावर माझा भर असेल,” असे त्यांनी सांगितले.