रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा; पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:34 PM2024-03-06T15:34:02+5:302024-03-06T15:35:47+5:30
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणेमेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली.
या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.
यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते. आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. आज लोकार्पण झालेल्या रुबी हॉल क्लिनीक ते रामवाडी मेट्रो मार्गामुळे वनाज ते रामवाडी हा मेट्रो प्रवास अधिक सुलभ होईल. पिंपरी-चिंचवड ते निगडी टप्पा 1 मार्गाचे काम सुरू होत असल्याने भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरालाही याचा फायदा होणार आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री