नव्या नोटांसाठी झुंबड...
By admin | Published: November 11, 2016 02:19 AM2016-11-11T02:19:39+5:302016-11-11T02:19:39+5:30
चलनातून बाद झालेल्या पाचशे-हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी विविध बँका व टपाल विभागाच्या कार्यालयांत तुफान गर्दी केली होती
पुणे : चलनातून बाद झालेल्या पाचशे-हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी विविध बँका व टपाल विभागाच्या कार्यालयांत तुफान गर्दी केली होती. सकाळपासून सुरू झालेली गर्दी सायंकाळी उशिरापर्यंत होती. गर्दीमुळे उडालेला गोंधळ, काही ठिकाणी वेळेत पैसे न मिळाल्याने नागरिकांची उडालेली तारांबळ, बहुसंख्य ठिकाणी नागरिकांनी दाखविलेली शिस्त अशा वातावरणात नोटा बदलून देण्याचा पहिला दिवस संपला.
नव्या नोटा घेण्यासाठी शहरातील सर्वच बँकांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्येक नागरिकाला चार हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यात येत होत्या. मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी लक्षात घेऊन बँकेच्या वतीने कर्मचारी नागरिकांना सूचना देताना दिसत होते. पद्मावती येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या कार्यालयाबाहेर माईकवर उद््घोषणा करण्याची सुविधा दिली होती. त्यावरून नागरिकांना पॅनकार्ड, आधारकार्ड अथवा ओळखपत्र सोबत आवश्यक असल्याची सूचना देण्यात येत होती. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील वेगळी व्यवस्था काही ठिकाणी पाहायला मिळाली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँका व टपाल विभागाच्या कार्यालयांत पोलीस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला होता.
मात्र, असे असले तरी टपाल विभागाच्या जीपीओ येथील कार्यालयासह काही ठिकाणी नवीन नोटा वेळेत पोहोचल्या नसल्याचे चित्र होते. काही खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांतदेखील हाच प्रकार दिसून आला. जिल्हा मध्यवर्ती बँक व पतसंस्थांमध्ये पैसे बदलून देण्याची तर सुविधाच नव्हती. मात्र, विविध ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीसे गोंधळाचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
टपाल विभागाच्या जीपीओ कार्यालयात सायंकाळी साडेपाचच्या सुमारासच नवीन चलनी नोटा संपल्याने नागरिकांना निराश होऊन परतावे लागले.
ससून रुग्णालयात पोस्टातर्फे विशेष सुविधा
पुणे : ससून शासकीय रुग्णालयातील रुग्ण आणि नातेवाइकांना ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून बाद केल्याचा त्रास होऊ नये, यासाठी पोस्टाने घेतलेल्या निर्णयाचे रुग्णालयात स्वागत करण्यात येत आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी या नोटा घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पोस्टाचे हे काऊंटर ससून रुग्णालयाच्या आवारातील बी.जे. मेडिकल महाविद्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले असून, नोटांची अडचण येणाऱ्या रुग्णांना तेथे जाऊन चलन बदलून घेण्याची विनंती करीत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले.
सामान्यांच्या हितासाठी पोस्टातर्फे घेण्यात आलेला हा निर्णय अतिशय स्तुत्य असून, आपल्या अडचणी काही प्रमाणात दूर झाल्याची भावना रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली.