थेरगावात ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 02:44 PM2021-04-26T14:44:47+5:302021-04-26T14:45:25+5:30
खबरदारी न घेता सुरक्षेची व्यवस्था न केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी: थेरगाव येथील पी के मेटल्सच्या कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन आग लागली. यात मोठे नुकसान झाले आहे. थेरगाव येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली होती. योग्य प्रकारे खबरदारी न घेता सुरक्षेची व्यवस्था न केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजिंदरकौर प्रितपालसिंग कंधारी (वय ६५), प्रितपालसिंग कंधारी (वय ७०, दोघेही रा. बाणेर) आणि पी. के. मेटल्स वर्कशॉपचे व्यवस्थापक, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वार पोपट कौलगे यांनी रविवारी (दि. २५) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील पी. के. मेटल्स या कंपनीत शनिवारी (दि. २४) दुपारी सव्वातीननंतर ज्वलनशील पदार्थांचा स्फोट होऊन आग लागली. ही कंपनी रहिवासी भागात असून याठिकाणी सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी घेण्यात आलेली नव्हती. स्फोट होऊन व आगीमुळे पी. के. मेटल्सच्या आसपासच्या दुकानांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नूमद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार पुढील तपास करत आहेत.