एफटीआयआयच्या ओपन डे ला ‘फ्लॅश मॉब’चे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 07:26 PM2018-08-11T19:26:43+5:302018-08-11T19:27:52+5:30
फि्ल्म अॅऩ्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट मध्ये अाज अाेपन डे निमित्त नागरिकांना एफटीअायअायच्या सफरीबराेबरच फ्लॅशमाॅबचाही अानंद लुटता अाला.
पुणे : पावसाचा सुखद शिडकावा...चहुकडे आल्हाददायी करणारी हिरवाई...पानांवर दवबिंदूची पसरलेली झालर...अशा सृजनशीलतेचा आस्वाद घेत एफटीआयआयच्या ‘मुक्त’ वातावरणात प्रवेश करीत असताना पुणेकरांना अचानक गणेशाचा ठेका ऐकायला येऊ लागला ...ही स्वागत करण्याची आगळीवेगळी पद्धत आहे की काय असे अनेकांना वाटले ..मात्र बघता बघता त्या ठेक्यावर तरूणाईने ताल धरू लागली..न् ‘हम फिट तो इंडिया फिट’ या गाण्यावर महाविद्यालयीन तरूणाईची पावले थिरकायला लागली..’ओपन डे’ च्या दिवशी ’फ्लॅशमॉब’च्या मिळालेल्या या सरप्राईजने पुणेकरांना सुखद धक्का दिला. सर्वांनीच हा क्षण कँमे-यात बंदिस्त केला....तर कुणी मोबाईलवर याचे रेकॉर्डिंग करत होते.. तरूणाईबरोबर आबालवृद्धांनाही बेभान होऊन नृत्य करण्याचा मोह आवरला नाही...या अभिनव उपक्रमामुळे पुणेकरांना एफटीआयआयची अविस्मरणीय सफर घडली.
गेल्या वर्षीपासून फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ही संस्था पुणेकरांना पाहाता यावी यासाठी प्रशासनाकडून‘ओपन डे’ चा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच ‘फ्लॅश मॉब’ आयोजित करण्यात आला. सकाळी 9.30 वाजता ‘ओपन डे’ ला प्रारंभ झाला. दर अर्ध्या अर्ध्या तासाने फ्लॅशमॉब सादर होत होता. काही लहान मुले संस्था बघायला आली होती...त्या ठेक्यावर पाय हलविण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही...संस्थेत उत्साहाचे वातावरण तयार झाले होते..आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी एफटीआयआयतर्फे फिटनेस या संकल्पनेवर ‘हम फिट तो इंडिया फिट’ या गाण्याची निर्मिती नँशनल सव्व्हिस स्कीम या प्रादेशिक संचालनालयाच्या सहकार्याने करण्यात आली. गीत, संगीताची धुरा विद्यार्थ्यांनीच सांभाळली. लेखन विभागाचा विद्यार्थी संजय सेन सागर याने गीतलेखन आणि अनुराग रोहित आणि शुभम या साऊंड विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणपती ठेक्याचा खुबीने वापर करून शब्दांना संगीतबध्द केले. गायक जसराज जोशीच्या स्वरासाजातून गाण्याला एक वेगळाच बाज आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एफटीआयआयकडून या फ्लॅशमॉबचे ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जाणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.