फ्लॅटच्या आमिषाने एक कोटीचा गंडा
By admin | Published: April 4, 2015 06:04 AM2015-04-04T06:04:45+5:302015-04-04T06:04:45+5:30
अल्पदरामध्ये सदनिका देण्याची आॅनलाईन जाहिरात करून २३ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आ
येरवडा : अल्पदरामध्ये सदनिका देण्याची आॅनलाईन जाहिरात करून २३ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
अंकुश बबन वडे (वय २९, रा. टेंभी, आग्रीवाडी, जि. पालघर, मूळ रा. बोईसर वेस्ट, मुंबई, सध्या रा. चाकण), योगेश रघुनाथ कारंडे ऊर्फ युवराज राजाराम गडकरी ऊर्फ युसुफ मकलाई ऊर्फ नंदकुमार कुंबळे ऊर्फ राज चव्हाण (वय ३१, रा. अॅमेनोरा टाऊन सेंटर, हडपसर, पुणे, मूळ रा. पाटण, जि.सातारा) व आकाश ऊर्फ विक्रांत उमेश पाटील (वय २२, रा. महाराष्ट्र हौसिंंग सोसायटी, येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नंदिनी रमेशकुमार ठाकूर गौतम (वय ३०, रा. एफ ४/१००८, आयव्ही वाईल अपार्टमेंट, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. नंदिनी या खराडीतील झेन्सार कंपनीत ज्येष्ठ संगणक अभियंता आहेत. या तिघांना ७ एप्रिलपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर स्वरूप शर्मा ऊर्फ राज शुक्ला ऊर्फ सूरज राकेश चोबे व रोहन पाटील हे दोघे जण अद्याप फरारी आहेत.
आरोपींनी विमाननगरमधील लुंकड स्कायमॅक्स इमारतीमध्ये तसेच लष्कर परिसरातील क्लोअर सेंटरमध्येही दुकान भाड्याने घेतले होते. आॅलमॅक्स रियालिटी एकर्स व वेलिंग्टन होम झोन इंडिया प्रा.लि. या कंपन्यांच्या नावाने स्वस्तामध्ये सदनिका देण्याच्या जाहिराती केल्या होत्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नंदिनी आणि अन्य गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर, विठ्ठल देवकर, प्रताप कोलते, राजेंद्र वाघ, चंद्रकांत जाधव, नवनाथ वाळके आदींनी तपास केला.