‘डीएसके’विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले , अडचणी वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:09 AM2017-11-16T02:09:34+5:302017-11-16T02:10:00+5:30
गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.
पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. अशा २०० ते २५० लोकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती़
धायरीतील डीएसके विश्वमध्ये आनंदघन फेज ६ मध्ये २०१३ मध्ये डीएसके यांनी बांधकाम सुरू केले होते़ या योजनेत सुमारे ४५० फ्लॅट असून, २०१३ पासून ही स्कीम सुरू करण्यात आली़ या ठिकाणी त्यापैकी अनेकांना डिसेंबर २०१६ मध्ये ताबा मिळणार होता़ एकीकडे फ्लॅटचा ताबा नाही, दुसरीकडे फायनान्स कंपनीचे हप्ते सुरू झाल्याने त्रस्त फ्लॅटधारकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती़ फ्लॅट घेतलेल्या लोकांनी सांगितले की, ‘डीएसके यांनी आधी ताबा, नंतर हप्ते, अशी योजना आखली होती़ त्यात ताबा मिळेपर्यंत आम्ही हप्ता भरू, असे डीएसके यांनी सांगितले होते़ त्याप्रमाणे त्यांनी काही हप्ते भरलेही़ परंतु, फेब्रुवारीपासून हप्ते भरणे बंद केले़ त्यामुळे फायनान्स कंपनीने आमच्या खात्यातून हप्त्याची रक्कम कापून घेण्यास सुरुवात केली आहे़ आमच्या स्कीममधील इमारतीचे काम वर्षभरापासून बंद पडले आहे़ ते कधी पूर्ण होईल याची काहीही शाश्वती नाही़’