पालिकेच्या भाडेकरूंना मिळणार सदनिकांची मालकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:25+5:302021-06-16T04:12:25+5:30
पुणे : पालिकेच्या मालकीच्या इमारतींमधील सदनिका भाडेकराराने देण्यात आलेल्या आहेत. मागील तीन दशकांपासून येथे रहात असलेल्या भाडेकरूंसाठी हेच घर ...
पुणे : पालिकेच्या मालकीच्या इमारतींमधील सदनिका भाडेकराराने देण्यात आलेल्या आहेत. मागील तीन दशकांपासून येथे रहात असलेल्या भाडेकरूंसाठी हेच घर आता स्वमालकीचे करता येणार आहे. ही घरे नागरिकांच्या नावावर करण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
पहिल्या टप्प्यात १ हजार ५१२ सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, बारा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत या सदनिकांची किंमत ठरविण्यात आली आहे.
शहरातील विविध भागांत रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन या सदनिकांमध्ये करण्यात आलेले आहे. त्यांना प्रतिमहिना ४५० रुपये भाडे आकारले जाते. या मिळकतीसंबधित भाडेकरू यांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला होता.
पालिकेच्या मुख्य खात्यासह औंध, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, ढोले पाटील रोड आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत या सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत. यातील १ हजार ८१ सदनिका मुख्य खाते तर, ४३१ सदनिका क्षेत्रीय कार्यालयांच्या आहेत.
--///--
पालिकेने १९९१-९२ सालापासून या सदनिका भाड्याने दिल्या आहेत. ज्या भागात या सदनिका आहेत, तेथील रेडिरेकनरचा दर लक्षात घेऊन याची विक्री केली जाणार आहे. सर्वसाधारण १२ ते १५ लाख या दरम्यान सदनिका उपलब्ध होणार आहेत. २७० चौरस फूट आकारातील या सदनिका आहेत.