लष्कर रस्त्यांवरच्या उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा
By admin | Published: November 21, 2015 04:08 AM2015-11-21T04:08:13+5:302015-11-21T04:08:13+5:30
घोरपडी व लुल्लानगरमधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न त्यात थेट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घातल्यामुळे सुटण्याची चिन्हे आहेत.
पुणे: घोरपडी व लुल्लानगरमधील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न त्यात थेट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घातल्यामुळे सुटण्याची चिन्हे आहेत. पर्रिकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी व आज पालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात लष्कराच्या ताब्यातील रस्ता कामासाठी पालिकेकडे देण्याला पर्रिकर यांनी हिरवा कंदील दाखवला.
खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, श्रीनिवास बोनाला, लष्कराचे भास्कर रेड्डी, के. जी. सिंग यादव आदी या बैठकीला उपस्थित होते.
या दोन्ही उड्डाणपुलाखालील रस्ता लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे पालिकेला तिथे काम करण्याबाबत अडचणी येत होत्या. स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांबरोबर वारंवार बैठका घेऊनही यातून मार्ग निघत नव्हता. पर्रीकर यांनी लुल्लानगर येथील रस्ता पालिकेला देण्याची तयारी दर्शवली.
त्यासाठी पालिकेने त्वरित सविस्तर प्रस्ताव तयार करावा व तो संबधित लष्करी कार्यालयाकडे सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
घोरपडी येथील उड्डाणपूल सिंगल पीलर सिस्टिमचा वापर करून केन्टिलिव्हर पद्धतीचा बांधवा. लष्कराच्या शाळेपासून पुढेपर्यंत हा पूल बांधावा, अशी सूचना पर्रीकर यांनी केली.
दोन्ही पुलांबाबत लष्करातील अधिकाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करावे, पालिकेने कामांचे सविस्तर प्रस्ताव करून लष्करी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करावी व १५ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव लष्कराच्या संबधित कार्यालयाकडे सादर करावेत असे पर्रीकर यांनी सांगितले.
या निर्णयामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उड्डाणपूल नसल्याने या भागातील काही रस्ते लष्कराने सुरक्षकेच्या कारणास्तव बंदही केले होते.
उड्डाणपुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षापासून रखडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलनेही केली होती. (प्रतिनिधी)