मुळशीत रस्त्यांची चाळण; पावसात चालणेही झाले कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:03 PM2018-08-21T23:03:08+5:302018-08-21T23:20:05+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी नाराजी
पौड : सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळशी तालुक्यातील सर्वच मार्र्गांवर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. परिणामी वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत सामान्य नागरिक, पक्ष, संघटना यांनी लेखी व तोंडी स्वरूपात अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. मात्र रस्ते बांधकाम व दुरुस्ती विभागाकडून केवळ त्यांना केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चांदणी चौक ते पिरंगुट, पौड, मुळशी रस्ता, हिंजवडी-माण-घोटावडे फाटा रस्ता, पाषाण-सुस-नांदे व लवळे फाटा या मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. तालुक्यातील अन्य गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. भर पावसात या रस्त्यावरून चालताना व दुचाकी चालवताना आपण केव्हा खड्ड्यात घसरून पडू या भीतीने नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पिरंगुट ते भूगाव दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे शाळकरी मुले, कंपनीचे कामगार यांचा बराच वेळ प्रवासातच जातो. रस्त्याच्या या स्थितीबाबत तालुक्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मोठ्या प्रमाणात चर्चा, विनोद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नुकतेच एक निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे मुळशी तालुकाप्रमुख संतोष मोहोळ यांनी दिली.
खड्ड्यांवरून व्हॉट्सअॅप ग्रुपवर होणारी चर्चा
सर्व मुळशीकरांसाठी आनंदाची बातमी....सबंध मुळशी तालुक्यातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या सर्व रस्त्यांना ‘शॉक अॅबसॉर्बर चाचणी रस्ता’ म्हणून जागतिक मानांकन मिळाले आहे. यामुळे या पावसात आपल्या वाहनाची चाचणी करून घेण्यासाठी मोठी झुंबड या रस्त्यावर उतरत आहे. त्यातल्या त्यात रामनदी ते माताळवाडी, लवळे फाटा ते घोटवडे फाटा, पौड ते आसदे हे मार्ग एकमेकांशी उत्तम खड्ड्यांच्या बाबतीत स्पर्धा करीत आहेत.
प्रथमच असे मानांकन मिळाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांची छाती गर्वाने फुलून ५६ इंच एवढी झाली आहे. लवकरच लिम्का आणि गिनीज बुकमध्ये या रस्त्यांची नोंद होणार असल्याने या संस्थेच्या प्रतिनिधीस मीच मुलाखत देणार अशी चढाओढ सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांमध्ये लागताना दिसत आहे.
बच्चेकंपनीसुद्धा अॅडवेंन्चर राईडची सोय इथेच करून दिल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांवर प्रचंड खूष आहे.
चला, तर मग तुम्ही अशी राईड आणि चाचणी करून घ्यायला आवर्जून मुळशीत या!