वाढला पक्ष्यांचा चिवचिवाट
By admin | Published: May 12, 2016 01:09 AM2016-05-12T01:09:31+5:302016-05-12T01:09:31+5:30
दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत असताना नागरिकांनी मात्र पशू-पक्ष्यांप्रती सहानुभूती दर्शविली आहे. पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याची सोय झाल्याने निगडी प्राधिकरणात पक्ष्यांचा
सांगवी : दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत असताना नागरिकांनी मात्र पशू-पक्ष्यांप्रती सहानुभूती दर्शविली आहे. पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याची सोय झाल्याने निगडी प्राधिकरणात पक्ष्यांचा सुमधुर चिवचिवाट नेहमीपेक्षा जास्त वाढला आहे.
नागरिकांमध्ये दर वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळामुळे पशु-पक्ष्यांप्रती जनजागृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांनी गच्ची, घराच्या गॅलरीत, खिडकीत पिण्याची पसरट प्लॅस्टिकची व मातीची भांडी ठेवली आहेत. तसेच, पक्ष्यांना खाण्यासाठी वेगवेगळी कडधान्ये ठेवली आहेत. काहींनी पक्ष्यांचे खाद्य विकत आणले जाते. यामुळे पक्ष्यांचा थवा पशू-प्राणिप्रेमींच्या घरासमोर भल्या पहाटेच जमू लागतात. पक्ष्यांचे विलोभनीय दृश्य पाहून नागरिक सुखावले आहेत. पशुपे्रमींनी धान्य नित्यनियमाने ठेवल्याने रोज ठिकठिकाणी पक्ष्यांचा थवा जमा होत आहे. त्यामुळे अन्न-पाण्याअभावी होणारी पक्ष्यांची भटकंती काही प्रमाणात थांबली आहे.
प्राधिकरणातील सेक्टर २४, २५, २६, २७, २८ या भागात उद्यानांचे प्रमाण जास्त असल्याने घनदाट झाडी आहेत. तसेच जवळच दुर्गादेवी टेकडी लागून असल्याने भटकंती करत आलेल्या पक्ष्यांचे प्रमाण या भागात जास्त दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष्यांचा चिवचिवाट जास्त प्रमाणात दिसून नागरिकांच्या कानी पडत आहेत. काही पक्षीप्रेमींनी उद्यानातदेखील प्लॅस्टिकच्या बाटल्या अर्ध्या कापून लटकविल्या आहेत. तर काहींनी आईसक्रीमची रिकामी भांडी लटकवली आहेत.(प्रतिनिधी)