गिरीश महाजनांच्या विराेधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची फ्लेक्सबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 06:46 PM2018-09-29T18:46:48+5:302018-09-29T18:48:22+5:30
मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे.
पुणे : पुण्यातील मुठा कालवा फुटल्याने शेकडाे कुटुंब बेघर झाले असताना मुठा कालवा हा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटल्याचा शाेध पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांनी लावला हाेता. याच वक्तव्याचा पुनराेच्चार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने त्यांच्यावर अाता सर्वच स्तरातून टीका हाेत अाहे. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा समाचार घेतला अाहे. त्यांच्यावर टीका करणारा फ्लेक्स झाशीची राणी चाैकात लावण्यात अाला अाहे.
गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास मुठा कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला. दांडेकर पुलाजवळील वसाहतीत कालव्याचे पाणी शिरल्याने येथील घरांचे माेठे नुकसान झाले. अनेकांचे सामान पाण्यात वाहून गेले, तर काहींचा संसार उघड्यावर पडला. कालव्याशेजारी टाकण्यात अालेल्या अनधिकृत केबल्समुळे हा कालवा फुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत हाेती. परंतु हा कालवा केबल्समुळे नाही तर उंदीर, घुस, खेकड्यांनी जमीन पाेखरल्याने फुटल्याचा अजब शाेध पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांनी लावला हाेता. तसेच गिरीश महाजनांनी सुद्धा उंदीर, घुशी मुळेच हा कालवा फुटल्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले हाेते. त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसने टीका केली अाहे. झाशीची राणी चाैकात लावण्यात अालेल्या फ्लेक्समध्ये महाजनांचा फाेटाे वापरण्यात अाला असून त्याखाली त्यांचे वक्तव्य लिहिण्यात अाले अाहे. त्याचबराेबर त्या खाली वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस असे लिहीण्यात अाले अाहे.
दर्शनी भागात हा फ्लेक्स लावण्यात अालेला असल्याने पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाला अाहे. दरम्यान दांडेकर पूल वसाहतीतील बाधीत नागरिकांचे जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत असून ज्यांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले अाहे असे अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत अाहेत.