Pune | शिरूर तालुक्यात फ्लेक्स, बॅनरवर बंदी; विजयस्तंभ अभिवादनानिमित्त प्रशासनाची खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:47 AM2022-12-21T10:47:42+5:302022-12-21T10:48:02+5:30
शिरूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये आदेश लागू....
कोरेगाव भीमा (पुणे) : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावा, यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ३१ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ पर्यंत फ्लेक्स, बॅनरवर बंदी घालण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी येत असतात, अभिवादन कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी फ्लेक्स, बॅनर लावले जातात. त्यावर अनेकदा आक्षेपार्ह मजकूर असतो. त्यामुळे तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापूर्वी फ्लेक्समुळे दोन समाजात वादावादी होऊन गुन्हे दाखल झाले होते. या अनुषंगाने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान, कोणाला फ्लेक्स बॅनर लावायचे असतील तर त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, जागामालक आणि संबंधित पोलिस ठाण्याची परवानगी घेणे आवश्यक राहील. दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे हा आदेश देण्यात आला आहे. सदर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही प्रांताधिकारी यांनी पोलिस प्रशासनास दिले आहेत. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती दिली.