फ्लेक्स, झेंडे हटविले
By admin | Published: January 10, 2017 04:02 AM2017-01-10T04:02:03+5:302017-01-10T04:02:03+5:30
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील राजकीय फ्लेक्स काढण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे
पुणे : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील राजकीय फ्लेक्स काढण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. रविवारी रात्रीपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण ३६ हजार ४५० बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर काढून टाकले. या साफसफाईमुळे शहरातील अनेक चौक, रस्ते चकाचक झाल्याचे दिसत होते.
आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांचे बोर्ड, चिन्ह यांचे फ्लेक्स लावण्यास मनाई करण्यात आली. राजकीय पक्षांचे बोर्ड या काळात झाकून ठेवले जातात. येत्या एक-दोन दिवसांमध्ये महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी शहरातील प्रमुख चौक, गल्लीबोळांत मोठ्या प्रमाणात पक्षाची जाहिरातबाजी केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही साफसफाई करण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच ही मोहीम हाती घेण्यात आली.
बोर्ड, झेंडे व पोस्टरही मोठ्या प्रमाणात काढण्यात आले, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी दिली.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांपुढे झळकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चौकात फ्लेक्स, बॅनर उभारण्यासाठी अत्यंत कमी खर्च येत असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून याचा सर्रास वापर करण्यात येत आहे. फ्लेक्समुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत असल्याने त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी याचिका दाखल केली होती. याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारण्यावर निर्बंध घातले आहेत, राजकीय पक्षांकडून असे फ्लेक्स उभारल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे ओदश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, काही राजकीय पक्षांना थेट उच्च न्यायालयाने लाखो रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मात्र, तरीही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजीचा आधार घेतला जात आहे. न्यायालयाच्या कारवाईचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.
फ्लेक्सवरील कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडील मनुष्यबळ आकाशचिन्ह विभागाने घेतले होते. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिरिक्त मनुष्यबळ या कारवाईसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.