पुण्यात भाजप कार्यकारणी बैठकीच्या परिसरात फ्लेक्सबाजी; परवानगीबाबत पालिका अनभिज्ञ
By राजू हिंगे | Published: May 18, 2023 04:45 PM2023-05-18T16:45:56+5:302023-05-18T16:46:40+5:30
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समिती बैठकीचा फटका जंगली महाराज रस्ता आणि परिसराला बसला
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहे. त्या निमित्ताने भाजपकडुन बालगंधर्व रंममंदिर, महाराणी झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता परिसरात फ्लेक्सबाजी केली आहे. त्यात पथदिव्यांच्या खांबांवरही स्वागतासाठीचे फलक लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सबाजीने शहराचे विदुपीकरण झाले आहे.
भाजप राज्य कार्यकारिणीची बैठकीला राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या स्वागतासाठी भाजप पुणे शहर आणि स्थानिक नेत्यांकडून फलकबाजी करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात अनधिकृत फ्लेक्स लावून घाण करू नका असे आदेश कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भर कार्यक्रमात दिले आहेत. मात्र, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून जंगली महाराज रस्त्यावर, झाशीची राणी चौकात अनधिकृत फ्लेक्स लावून राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांचे स्वागत करणारे फ्लेक्स झळकले आहेत.
प्रत्येक फ्लेक्सला परवानगी घेतली
भाजपच्या राज्य कार्यकारणी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फलेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक फ्लेक्सला पालिकेची परवानगी घेण्यात आली आहे. त्याबाबत पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, फलेक्स लावण्याबाबत परवानगी घेतली आहे की नाही या बाबत क्षेत्रिय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल. परवानगी घेतली नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
बेशिस्तपणे उभा केलेल्या वाहनांमुळे पुणेकरांना मनस्ताप
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समिती बैठकीचा फटका जंगली महाराज रस्ता आणि परिसराला बसला आहे. जंगली महाराज रस्त्याच्या दुतर्फा आणि आसपासच्या गल्ल्यांमध्ये मिळेल तिथे मोटारी, दुचाकी लावण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडींचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागला आहे. सकाळची वेळ असल्याने कामासाठी कार्यालयात पोहोचण्यासाठी निघालेले नोकरदार वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. जंगली महाराज रस्त्या बरोबरच ओंकारेश्वर परिसरातही बेशिस्तपणे वाहने उभी करण्यात आली आहेत. त्याचा पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.