पिंपरी-चिंचवडमध्ये रंगले फ्लेक्स वॉर
By admin | Published: December 31, 2016 05:31 AM2016-12-31T05:31:32+5:302016-12-31T05:31:32+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू झाले आहे. विकासाच्या वाटेवर पिंपरी-चिंचवडकर
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू झाले आहे. विकासाच्या वाटेवर पिंपरी-चिंचवडकर अशी राष्ट्रवादीने, तर भ्रष्टाचार आणि भयमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी भाजपा सरकार अशी फ्लेक्सबाजी भाजपाने केली आहे. आरोप-प्रत्यारोपांनतर फ्लेक्स वॉर सुरू झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच या दोन्ही पक्षांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पक्षीय पातळीवरील आरोप वैयक्तिक पातळीवर आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरकारभाराला भाजपाने लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीतील आणि शिवसेनेतील ठरावीक नेत्यांना लक्ष्य करण्याचे धोरण भाजपाने आखले आहे. भाजपाने स्वतंत्रपणे फ्लेक्सबाजी केल्याने युतीची शक्यता मावळली आहे. तर या फ्लेक्सबाजीत शिवसेना, मनसे व इतर पक्ष कोठेही दिसत नाही. फ्लेक्सवॉरची चर्चा आहे.(प्रतिनिधी)
आरोपांवर भर, ठोस कारवाई नाहीच
शिवसेनेवरील टीकेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कानपिचक्या दिल्याने शिवसेनेवरील आरोप कमी करून राष्ट्रवादीला लक्ष केले आहे सत्ताधारी व विरोधात प्रत्यारोपांचे वॉर सुरू असतानाच आता फ्लेक्सवॉर सुरू झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये भाजपाने आणि राष्ट्रवादीने फ्लेक्स उभारले आहेत. विकास हा मुद्दा राष्ट्रवादीने घेतला आहे. बीआरटी, उड्डाणपूल, विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची छायाचित्रे वापरून विकासाच्या वाटेवर पिंपरी-चिंचवडकर, अशी फ्लेक्सबाजी राष्ट्रवादीने केली आहे. तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र वापरून भय आणि भ्रष्टाचारमुक्त शहरासाठी, अशी फ्लेक्सबाजी भाजपाने केली आहे.