फ्लेक्सबाजीला पालिकेचाच वरदहस्त

By admin | Published: May 11, 2015 06:32 AM2015-05-11T06:32:10+5:302015-05-11T06:32:10+5:30

शहरातील चौकाचौकांमध्ये फ्लेक्स उभारून विदु्रपीकरण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

Flexing | फ्लेक्सबाजीला पालिकेचाच वरदहस्त

फ्लेक्सबाजीला पालिकेचाच वरदहस्त

Next

दीपक जाधव, पुणे
शहरातील चौकाचौकांमध्ये फ्लेक्स उभारून विदु्रपीकरण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला धारेवर धरले असतानाच राजकीय नेत्यांच्या या फ्लेक्सबाजीला महापालिका प्रशासनाकडूनच अभय असल्याची माहिती उजेडात आली आहे. गेल्या साडेतीन वर्षामध्ये केवळ दोन नेत्यांनीच फ्लेक्स लावण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली असून, या कालावधीत एकाही राजकीय नेत्यावर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती उजेडात आली आहे.
शहरातील प्रत्येक चौकाचौकांत वाढदिवस, सण तसेच उत्सवांचे निमित्त साधून स्थानिक नेते, कार्यकर्त्यांच्या चमकोगिरीचे फ्लेक्स झळकत असतात. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, पदपथावर बांबूचे सांगाडे लावून हे फ्लेक्स उभारले जातात. तसेच अनेक चौकांत चक्क वाहतूक दिवे, पथदिवे झाकून फ्लेक्स लावले जातात. जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१५ या कालावधीमध्ये किती राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी महापालिकेची परवानगी घेतली याची विचारणा लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांनी केली होती.
महापालिकेकडे रितसर शुल्क भरून आॅक्टोबर २०१३ मध्ये रोहित टिळक यांनी २५ बोर्ड लावण्याची व डिसेंबर २०१३ मध्ये अभय छाजेड यांनी ७३ बोर्ड लावण्याची परवानगी घेतली होती, असे उत्तर पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गेल्या ३ वर्षांत शहराच्या प्रत्येक चौकात असंख्य राजकीय नेत्यांचे फ्लेक्स झळकले आहेत. मात्र, दोन अपवाद वगळता त्यांच्यापैकी कोणीच परवानगी घेतली नाही. मात्र, महापालिका प्रशासनाकडून एकाही नेत्यावर फ्लेक्स लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही.
बेकायदेशीरपणे फ्लेक्स लावल्याप्रकरणी या कालावधीमध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून ७७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी संघटना व इतर एक -दोन अपवाद वगळता हे सर्व गुन्हे बिगर राजकीय व्यक्तिंवर दाखल करण्यात आले आहेत. मोबाइल कंपन्या, सिमेंट कंपन्या, खाजगी क्लासेस यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल केले आहेत. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक १५ गुन्हे दाखल केले. त्या पाठोपाठ कोथरूड कार्यालयाने १४, भवानी पेठ कार्यालयाने १३, कसबा विश्रामबाग कार्यालयाने १० गुन्हे दाखल केले.

७ कार्यालयांकडून कारवाईच नाही
गेल्या साडेतीन वर्षांत सहकारनगर, बिबवेवाडी, हडपसर, धनकवडी, कोंढवा, वानवडी, औंध, टिळक रोड या क्षेत्रीय कार्यालयांकडून अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयाने २, तर धनकवडी, कोंढवा, औंध या कार्यालयांनी केवळ प्रत्येकी १ गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Flexing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.